मुंबई : पालघरजवळ झालेल्या दोन साधूंच्या हत्येप्रकरणानंतर शिवसेनेने प्रश्न काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ही घटना लाजीरवाणी असून महाराष्ट्राच्या परंपरेस हादरा बसला आहे. या घटनेचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. असे असले तरी हादरा बसावा म्हणून कोणी हे सर्व घडवले नाही ना, अशी शंका शिवसेनेना उपस्थित केली आहे. 'सामना' दैनिकाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ही घटना अफवेतून घडली आहे. याला धार्मिकतेचा रंग देऊ नका. जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. उगाचच याचे राजकारण करु नका, असे बजावले आहे.


आजही राज्याच्या ग्रामीण भागात अज्ञान, अंधश्रद्धी आणि अफवा फसरविल्या जात आहेत. अशा जाळ्यात महाराष्ट्र अडकला आहे. त्यातून चंद्रपूर, धुळे आणि डहाणू-पालघरसारख्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करु नये, असा स्पष्ट इशाराही शिवसेनेने सामना अग्रलेखातून दिला आहे.


पालघर परिसरात दोन साधूंची जमावाने निर्घृणपणे हत्या केली. त्याचा धिकार आहे. हा सर्व प्रकार म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रकार आहे, हे आता उघड होऊ लागले आहे. कारण काही मंडळींनी याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. साधूंची हत्या जितकी निषेधार्ह, साधूंचे रक्त सांडणे जितके निर्घृण आणि अमानुष तितकेच अमानुष या प्रकरणास धार्मिक रंग देण्याचे कारस्थान आहे. साधूंवर हल्ला करणारे जितके नराधम आहेत, तितकेच नराधम या प्रकरणास जातीय आणि धार्मिक रंग देणारे आहेत अशी टीका शिवसेनेने केली आहे.


पालघरमधील गडचिंचले या गावात जेथे ही दुर्घटना घडली तो आदिवासीबहुल परिसर आहे. गुजरातच्या सीमेवरील डहाणूजवळ हे घडले. जे घडले ते अतिशय भयंकरच आहे. हे सगळे रात्री घडले. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या समूहातील १००च्यावर लोकांना अटक केली. त्यामुळे पोलीस काय करीत होते,  सरकार झोपले होते काय, हे प्रश्न निरर्थकआहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे.


अनेक राजकीय भक्त मंडळींचे दुःख असे की, महाराष्ट्रात दोन साधूंची हत्या झाली, समाज माध्यमांवर धार्मिक भेदाभेदीचे विष पेरले गेले तरीही महाराष्ट्रात धार्मिक उन्माद उसळला कसा नाही? त्यामुळे अनेकांना वैफल्य येणे साहजिकच आहे.   शिवसेनाप्रमुखांच्या राज्यात हिंदू साधूंची हत्या होते यावर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. या चिंतेमागचे खरे कारण वेगळेच आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही समाज माध्यमांवर या घटनेवरून अश्रूंचा पूर वाहिला आहे. पण याआधी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात धुळ्यात पाच आणि चंद्रपुरात एका हिंदू गोसाव्याची जमावाने अशीच निर्घृण हत्या केली होती. तेव्हा हा हिंदुहृदयसम्राटांचा महाराष्ट्र नव्हता काय? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.


दरम्यान, पालघरच्या घटनेनंतर एका विशिष्ट विचारांचे तसेच संस्था आणि संघटनेशी संबंधित लोक बोलत आहेत आणि लिहित आहेत. हेसुद्धा धक्कादायक आहेत.  काहींचा हिंदुत्ववाद या निमित्ताने उफाळून आला आहे, पण या उफाळणार्‍याया उकाळ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, ज्या गडचिंचले गावात ही दुर्घटना घडली ते गाव व ग्रामपंचायत गेली दहा वर्षे पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आहे. सरपंच भाजपचाच आहे. म्हणजे मारहाण करणार्‍यायांचा रंग कोणता, हे सांगायला नको ,अशी टीका शिवसेनेने केली आहे.