मुंबई : दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित तसेच कमी करण्याच्या अनुषंगाने राज्यातील दुकाने आणि मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्यात आली आहे. राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. ९ जुलैपासून ही संमती देण्यात येत आहे. तथापी, यासाठी आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील. मिशन बिगिन अगेन टप्पा ५ अंतर्गत मंगळावीर यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या क्षेत्रात मिशन बिगिन अगेन टप्पा २ मध्ये मार्केट तसेच अत्यावश्यक नसलेल्या दुकानांना पी वन – पी टू बेसीस वर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती. आता दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित तथा कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. 



या महापालिकांमधील कंटेनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील मार्केटना आठवड्यातील ७ दिवस परवानगी देण्यात येत आहे. दुकानांना पी वन – पी टू बेसीसवर परवानगी देण्यात येत आहे. राज्याच्या उर्वरित भागात मार्केट आणि दुकानांना आठवड्यातील सात दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास संमती देण्यात आली आहे. सामाजिक अंतराचे पालन न केल्याचे आढळल्यास किंवा गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यास प्रशासन संबंधित दुकाने किंवा मार्केट बंद करेल.  मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी या वाढीव वेळेचा संबंधित मार्केट आणि दुकान मालक वापर करतील, राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.