मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची मुदत तीन मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. असे असले तरी टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राज्यात लॉकडाऊनचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे, असे ते म्हणालेत.


कोरोनामुळे ठप्प असलेले व्यवहार टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. सोमवारी, २० एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल,  असे अजित पवार म्हणालेत. देशात जाहीर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काल मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी त्याचं काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केल आहे. 


मार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली असली तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही नियमित सुरु राहील, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 


नागरिकांना, कोरोना प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावं, घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असं आवाहनही केले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. दवाखाने, हॉस्पिटल, औषधांची दुकाने, पॅथोलॉजी सेंटर, ॲम्बुलन्स सेवा सुरु आहेत. शेतीच्या मशागतीच्या कामांवरही कोणतही बंधन नाही. शेती आणि शेती उद्योगाशी संबंधीत सर्व कामे, दुकाने, व्यवहार सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.


 तूर, कापूस, हरभरा खरेदी योजना देखील सुरु राहणार आहे. दूधव्यवसाय, पशुपालन, मत्स्योद्योगविषयक कामांनाही परवानगी आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरु राहणार आहेत. अनाथालये, वृद्धाश्रम आदी सामाजिक संस्थांचं कामकाजही सुरु राहील. 


अंगणवाड्या बंद असल्या तरी बालकांना पोषणआहार घरपोच दिला जाणार आहे. शाळा, कॉलेज बंद असली तरी ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. बँका, वित्तीय संस्थांचे व्यवहार सुरु राहणार असले तरी नागरिकांनी तिथे गर्दी करु नये, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.