देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: शिक्षक आमदार आणि जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव कपिल पाटील आज जनता दल युनायटेडला सोडचिट्टी देणार आहेत. कपिल पाटील आज स्वतःच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. समाजवादी विचारसरणीच्या लोकांना, विचारवंतांना एकत्र घेऊन कपिल पाटील स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी एनडीएमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केल्यामुळे कपिल पाटील नाराज होते. आज सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाची घोषणा करणार आहेत. 


महाराष्ट्रभरातून आजच्या कार्यक्रमासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कपिल पाटील यांचा नवा पक्ष महाविकास आघाडी सोबत आणि इंडिया आघाडी सोबत राहणार आहे.


‘समाजवादी ऐक्याचा धम्मघोष, समाजवादी गणराज्याचा संकल्प,’ असा नारा देत आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज धारावीत संयुक्त समाजवादी संमेलन होणार आहे. राज्याचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या संमेलनाला संबोधित करणार आहेत. राज्यभरातील समाजवादी जनता परिवारातले नेते, कार्यकर्ते, जन संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने त्यात सामील होत आहेत. 


नव्या राजकीय भूमिकेची घोषणा


कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्या राजकीय भूमिकेची घोषणा होणार आहे. या संमेलनात आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वात समाजवादी जनता परिवाराच्या ऐक्याची भूमिका आणि समाजवादी गणराज्याचा संकल्प जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती अतुल देशमुख यांनी दिली. 


समाजवादी विचारांची 6 टक्के मतं


राज्यात समाजवादी विचारांची 6 टक्के मतं असल्याचे पुण्यातील एका मोठ्या वृत्तपत्र समूहाच्या सर्वेतून आढळून आलं होतं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी ऐक्याच्या घोषणेचं महत्त्व आहे. चळवळीतील अनेक नामवंत कार्यकर्ते व मान्यवर धारवीच्या संमेलनात हजेरी लावणार आहेत, असं अतुल देशमुख यांनी सांगितलं.


समाजवादी विचारांचे आमदार 


कपिल पाटील हे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील एकमेव समाजवादी आमदार असल्याचे सांगितले जाते. ते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी ट्रस्टीदेखील आहेत. समाजवादी नेता बापूसाहेब काळदाते यांच्यानंतर समाजवादी आंदोलनातील एका कार्यकर्त्याला राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान देण्यात आला. कपिल पाटील सलग 3 वेळा महाराष्ट्र विधान परिषदेत मुंबई शिक्षकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. शिक्षण आणि शिक्षकांच्या अधिकारांसाठी ते विधिमंडळात नेहमी आवाज उठवत असतात. त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. ओबीसी आणि मंडल आयोग आंदोलनात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.