मुंबई : अभिनयाकडून राजकारणाच्या वर्तुळाकडे वळलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यामुळे यंदा मुंबईतील लोकशाही निवडणुकांची लढत आणखी रंगतदार ठरली. भाजपाचा बालेकिल्ला म्हणऊन ओळखल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईच्या मतदार संघात उर्मिलाने गोपाळ शेट्टींना चांगलीच झुंज हिली. पण, या मतदार संघात पुन्हा एकदा भाजपाचंच पारडं जड दिसत असून उर्मिला मातोंडकर यांनी पराभव स्वीकारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईव्हीएम यंत्राचे क्रमांक आणि स्वाक्षरी यांमध्ये काहीतरी बिघाड असल्याची तक्रार करत निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये झालेला घोळ तिने समोर आणला होता. सदर प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली. पण, पराभव मात्र त्यांनी नाकारला नाही. आपल्याया या निवडणुकीत साथ देणाऱ्या मतदारांचे आभार मानत त्यांनी भाजपाला शुभेच्छाही दिल्या आहेत. सध्याच्या घडीला आपल्याला इथे बसून रडीचा डावही खेळता आला असता. पण, तसं करण्यात काहीच रस नसल्याचं उर्मिला यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं. 


राजकीय कारकिर्दीत पहिल्याच वळणावर अपयशाचा सामना करावा लागल्यामुळे यापुढे राजकारणात सक्रिय राहणार का, असा प्रश्न विचारला असता, यापूर्वीही ज्याप्रमाणे मी सांगितलं आहे, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सांगते की राजकारणापासून मी दूर जाण्याचा कोणताच प्रश्न उदभवत नाही असं थेट आणि स्पष्ट उत्तर त्यांनी दिलं. 



दरम्यान उर्मिला मातोंडकर यांच्या आव्हानामुळे गोपाळ शेट्टी यांची मतदार संघातील प्रतिष्ठा पणाला लागली होती. मुळात मुंबईतील एकूण सहा मतदारसंघांपैकी याच मतदारसंघात सर्वाधिक मतदान (५९.३२ टक्के) झाल्याचं सांगितलं जात होतं. शिवाय २०१४ च्या तुलनेत इथला मतदानाचा आकडाही वाढला होता.