Loksabha 2024 : लोकसभेच्या 48 जागांवरून महायुतीत (Mahayuti) जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप (BJP) राज्यातील सर्वाधिक जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असतानाच आता शिर्डी लोकसभा मतदारसंघावरही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दावा केलाय. शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटाचे असून ते मोदींच्या लोकप्रियतेमुळे दोनवेळा निवडून आले असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे शिर्डीची जागा भाजपला मिळावी असा त्यांचा आग्रह आहे. यावरून इथं शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतली बैठक रद्द
महायुतीची दिल्लीतली बैठक रद्द झालीय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा (Ajit Pawar) दिल्ली दौरा रद्द झालाय. दिल्लीत आज केवळ भाजप नेत्यांचीच बैठक होणार आहे. महायुतीच्या जवळपास 6 जागांवर वाद अद्याप आहे. नाशिक, परभणी, सातारा, शिरूर, गडचिरोली, संभाजीनगर या जागांवरुन मतभेद आहेत, त्यामुळे आजच्या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघेल असं सांगितलं जात होतं. मात्र आता आजची बैठक रद्द झाल्यानं महायुती जागावाटपाचा तिढा कायम आहे.


नाशिकच्या जागेवरुन वाद
नाशिक लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीत मोठ्या हालचाली सुरू आहेत.. विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना डच्चू मिळणार असल्याचं बोललं जातंय. स्वामी शांतिगिरी महाराज महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर स्वामी शांतिगिरी महाराजांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अर्धा ते पाऊस तास चर्चा झाली...


जानकारांचा महायुतीला इशारा
महादेव जानकरांनी महायुतीला सूचका इशारा दिलाय. परभणी आणि माढामधून आपणच निवडून येऊ. असा इशारा जानकरांनी महायुतीला दिलाय तर महादेव जानकरांसोबत एक-दोन दिवसात भेट होईल.. त्यांचा प्रस्ताव काय आहे ते जाणून घेऊ असं विधान शरद पवारांनी केलंय. त्यामुळे जानकर मविआच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. 


शिवतारेंचा पवारांना इशारा
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी अजित पवारांसह शरद पवारांना खुलं आव्हान दिलंय. बारामती कुणा एकाचा सातबारा नाही म्हणत अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय असं आव्हान शिवतारेंनी दिलीय. आता लढाई दोन पवार विरुद्ध विजय बापू शिवतारे म्हणत त्यांनी शड्डू ठोकलाय. विजय शिवतारेंना जाहीर भाषणातून आव्हान देत अजित पवारांनी पुरंदरमध्ये त्यांचा पराभव केला होता. त्याची सल शिवतारेंच्या मनात अजून आहे. आता शिवतारेंनी अजित पवारांसह शरद पवारांना खुलं आव्हान दिलंय.. 


दोन ते तीन दिवसात आचारसंहिता
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या दोन बैठका होणारेत. सोमवार आणि बुधवारी कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आजच्या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, अतुल सावे, रवींद्र चव्हाण सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेत, आचारसंहिता लागण्यापूर्वी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यताय.  दरम्यान, येत्या एक-दोन दिवसांत आचारसंहिता लागेल, आचारसंहिता लागल्यानंतर इतर पक्षातले मोठे नेते भाजपमध्ये, शिंदे गटात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावा गिरीश महाजन यांनी केलाय.