अरुण पेडणेकर, झी मीडया, मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जवळपास सर्व जागांवर उमेदवार जाहीर आहेत. उमेदावारांसाठी प्रचाराची धामधुम सरु झाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मुंबई उत्तर पूर्वचे (Mumbai North-East Constituency) भाजप उमेदवार मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या रॅलीत दगडफेक झाली. सोमवारी रात्री कोटेचा यांचा प्रचाररथ प्रचार करत होता. तेव्हा ही दगडफेकीची घडना घडली. या दगडफेकीवरुन मिहिर कोटेचांनी प्रतिस्पर्धी असलेले ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्यावर गंभीर आरोप केलेत.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिहिर कोटेचा यांचे आरोप
मानखूर्दमध्ये संजय पाटील यांच्या गुंडांकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला, संजय पाटील यांनी मानखुर्दला गुंडांचा अड्डा बनवला आहे.. संजय पाटील मानखुर्दला मिनी पाकिस्तान बनवत आहेत असे आरोप मिहिर कोटेचांनी केलेत.


मिनी पाकिस्तान (Mini Pakistan) किंवा छोटा पाकिस्तान. राजकीय निवडणुकीत हा मुद्दा वारंवार येत असतो. खासकरुन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातून. छोटा पाकिस्तानचा हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीतही गाजतोय. मिहिर कोटेचांनी थेट संजय दिना पाटील यांच्यावर मानखुर्दला मिनी पाकिस्तान बनवल्याचा आरोप केलाय. तर मिहीर कोटेचांनी रडीचा डाव बंद करावा असा पलटवार संजय पाटील यांनी केलाय. भाजपचे नौटंकीबाज नेत आणि नौटंकीबाज कार्यकर्ते आहेत. दुसरं काही राहिलं नाही, म्हणून आता हिंदू-मुस्लीम करायचं, जातीयवादी बोलायचं, आता रडीचा डाव बंद करा असा टोला संजय पाटील यांनी लगावलाय.


उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात ढोबळ मानाने विचार केल्यास सर्व मतदारसंघांवर शिवसेना-भाजप युतीचं प्राबल्य दिसतं. मात्र याला अपवाद आहे तो मानखुर्द शिवाजीनगरचा. मानखुर्द शिवाजीनगरचं प्रतिनिधित्व अबु आझमी करतात. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये मुस्लिम आणि दलितांची संख्या अधिक आहे. एका आकडेवारीनुसार उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या 16 टक्के आहे..


2009 मध्ये संजय दिना पाटील यांनी मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून 20 हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली होती. तेव्हा मानखुर्द शिवाजीनगर परिसरातली मतं यंदाही संजय दिना पाटील यांच्या पारड्यात गेल्यास भाजप उमेदवाराला अडचणीची ठरु शकतात.  दरम्यान, महाराष्ट्र दिनी मानखुर्दमध्ये खुलेआम येण्याचं आव्हान भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांनी दिलंय.. तेव्हा मिनी पाकिस्तानवरुनचा हा वाद आणखीन पेटण्याची शक्यता आहे.