Loksabha 2024 : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी कार्डच महत्त्वाचं ठरतंय. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीचं (Mahayuti) लोकसभा जागावाटप पूर्ण झालंय. उमेदवार निवडताना मविआनं मराठी माणसालाच प्रथम प्राधान्य दिलंय. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट 4, तर काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत मविआचं 'मराठी कार्ड'
मविआचे 6 पैकी सर्वच्या सर्व उमेदवार मराठीच (Marathi Candidate) आहेत. यात शिवसेना ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील, तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आगे. हे सर्व मराठी उमेदवार आहेत. तर काँग्रेसने उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आणि उत्तर मुंबईतून भूषण पाटील हे 2 मराठी उमेदवार दिलेत.


महायुतीचे 2 उमेदवार अमराठी
मुंबईत महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप समसमान म्हणजे प्रत्येकी 3 जागा लढवत आहे. महायुतीनं 6 पैकी 4 जागांवर मराठी, तर 2 जागांवर अमराठी उमेदवार दिलेत. उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियूष गोयल
आणि उत्तर पूर्व मुंबईतून मिहीर कोटेचा असे भाजपचे 2 उमेदवार अमराठी आहेत. उत्तर मध्य मुंबईतून भाजपनं अॅड. उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलंय.  शिवसेना शिंदे गटानं दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव, दक्षिण मध्य मुंबईतून विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर या मराठी उमेदवारांना तिकीटं दिलीत.


उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्यावेळी भाजपचे 3 खासदार मुंबईतून निवडून आले होते. मात्र यंदा त्या तिन्ही खासदारांचे पत्ते कापून 3 नव्या चेहऱ्यांना भाजपनं मैदानात उतरवलं. उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियूष गोयल यांना मैदानात उतरवलं. उत्तर पूर्व मुंबईतून मनोज कोटक यांच्याजागी मिहीर कोटेचांना संधी दिली. तर उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजनांचा पत्ता कापून अॅड. उज्ज्वल निकम यांना भाजपनं तिकीट दिलं.


मुंबईत 'काँटे की टक्कर' 
मुंबईत कुणाचा सामना कुणाशी होणार, याचं चित्र देखील स्पष्ट झालंय. दक्षिण, दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम या 3 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा सामना रंगणाराय...
उत्तर पूर्वमध्ये शिवसेनेची मशाल विरुद्ध भाजपचं कमळ अशी टक्कर होईल. उत्तर मध्य आणि उत्तर मुंबईत भाजपचं कमळ विरुद्ध काँग्रेसचा हात अशी चुरशीची लढत होणाराय... 


येत्या 20 मे रोजी मुंबईत लोकसभेनसाटी मतदान होतंय. तर मुंबईकरांचे नवे खासदार कोण, हे पाहण्यासाठी 4 जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे.