Loksabha 2024 : काँग्रेस नेते नसीम खान यांनी एकही मुस्लिम उमेदवार का दिला नाही असा सवाल विचारला आणि चर्चांना उधाण आलं.. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून वर्षा गायकवाड 
(Varsha Gaikwad) यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच तिथून इच्छुक असणाऱ्या नसीम खान (Naseem Khan) यांनी स्टार प्रचारक म्हणून राजीनामा दिला. मविआनं एकही मुस्लिम उमेदवार का दिला नाही असा सवाल विचारत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. त्यामुळं आता मुस्लिम समुदायाचा केवळ मताच्या राजकारणासाठी वापर होतोय का? असा प्रश्न उपस्थित केल्या जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नसीम खान यांची नाराजी
महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकही मुस्लीम उमेदवार न दिल्याने मुस्लीम समाजाने रोष व्यक्त केला असून तुम्ही काँग्रेसचे मोठे असतानाही महाराष्ट्रात उमेदवार का दिला नाही असा प्रश्न मुस्लीम समाज आपल्याला विचारत असल्याचं नसीम खान यांनी सांगितलं. मी त्यांच्या प्रश्नाशी सहमत आहे. अनेक भागात अल्पसंख्याक मतदार आहेत, पण एकाही मतदारसंघात अल्पसंख्यांक उमेदवार देण्यात आलेला नाही अशी खंतही नसीम खान यांनी व्यक्त केलीय.


मविआला मुस्लिम उमेदवारांचं वावडं?
महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या 10-11% मुस्लिम मतदार आहेत. मुस्लिम मतदार हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पारंपरिक पाठिराखा राहिलाय. 2019मध्ये काँग्रेसनं लोकसभेला अकोल्यातून बरकतुल्ला पटेल यांना उमेदवारी दिली होती.उत्तर मुंबईचा अपवाद वगळता मविआकडून सर्व जागा जाहीर करण्यात आल्यात. थोडक्यात 47 जागांवर एकही मुस्लिम उमेदवार मविआने दिलेला नाही


महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची लोकसंख्या
हाराष्ट्रात मुस्लिमांची लोकसंख्या ही 14 टक्के आहे. मुंबईतील लोकसभा मतदार संघात मुंबई दक्षिण मध्ये 21 टक्के, मुंबई दक्षिण मध्य मध्ये 20 टक्के, मुंबई उत्तर मध्यमध्ये 25 टक्के, मुंबई उत्तर पश्चिम मध्ये 19 टक्के, मुंबई उत्तर पूर्व मध्ये 16 टक्के तर मुंबई उत्तर मध्ये 9 टक्के इतकी आहे. मुंबईतील विशेषतः मुंबई उत्तर मध्य मधील मुस्लिम समुदायांची संख्या लक्षात घेऊनच नसीम खान यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. 


छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धुळे तसंच मुंबईतील सहाही मतदारसंघात मुस्लिमांची लोकसंख्या ही निर्णायक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे मविआतील प्रमुख पक्ष असतानाही या पक्षांनी एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे मविआला मुस्लिम उमेदवारांचं वावडं आहे का, मविआला मुस्लिम उमेदवारांचा फटका बसणार का याची चर्चा सुरु झालीय..