Sharad Pawar on Modi Offer : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट (NCP Sharad Pawar Group) आणि उद्धव ठाकरे (Shivsena UBT) गट हे दोन्ही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होऊ शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचं कारण ठरलं शरद पवारांनी (Sharad Pawar) वर्तवलेलं भाकित. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना थेट एनडीएमध्येच येण्याची ऑफर दिली आहे. पीएम मोदी नंदूरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी झालेल्या प्रचार सभेत त्यांनी ही ऑफर दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा अर्थ असा आहे की नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेनेने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार बनवलं आहे.  पण 4 जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील, असं पीएम मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलंय.


शरद पवार यांचं उत्तर
पीएम मोदींच्या ऑफरवर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. मोदींची भाषणं ही देशाच्या हितासाठी नाहीत. देशाच्या हिताचं नाही तिथे जाणार नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलीय. आमची विचारधारा गांधी आणि नेहरूंची असल्याने, त्यांच्यासोबत जाणं कदापी शक्य नाही. पंतप्रधानांच्या ऑफरवर शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडलीये. मोदींमुळे संसदीय लोकशाही पद्धतीवर पंतप्रधानांचा विश्वास नसून ती संकटात आल्याचा आरोपही पवारांनी केलाय.


विरोधकांचाही हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. मोदींचं वक्तव्य म्हणजे ते सत्तेत येत नाही असा आमचा दावा खरा ठरत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलीय. तर पंतप्रधान मोदी अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळे ते अशी वक्तव्य करत असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलीय. 


नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही.वैचारिकदृष्ट्या, आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत.  तेव्हा ही विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आमच्यासोबत येणाऱ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळेल. उद्धव देखील समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे. ती आमच्यासारखीच आहे.  आम्ही घाई-घाईनं निर्णय घेणार नाही. कोणताही निर्णय सहकाऱ्यांच्या संमतीनेच घेऊ असं पवारांनी म्हटलं होतं.