दक्षिण मुंबईत शिवसेना वि. शिवसेना, यामिनी जाधव अरविंद सावंत यांची हॅटट्रिक रोखणार?
South Mumbai Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईत महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. तर महायुतीकडून यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आलंय.
South Mumbai loksabha Seat Constituency : दक्षिण मुंबई. अर्थात महाराष्ट्राची राजधानी मुंबई. जिथून अख्ख्या महाराष्ट्राचा कारभार चालतो, ते मंत्रालय. जिथं कायदे बनतात ते विधानभवन. या कायद्यांवर शिक्कामोर्तब होतं ते राज भवन अशी सगळी सत्ताकेंद्र इथंच आहेत. ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया, जागतिक वारसा लाभलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, शेअर बाजार, रिझर्व्ह बँक, राणीची बाग, मुंबई महापालिकेचं मुख्यालय. मुंबादेवी आणि महालक्ष्मी मंदिर ही पवित्र देवस्थानं. हाजीअलीचा दर्गा. वरळी वांद्रे सी लिंक दक्षिण मुंबईतलाच. गीतानगरातल्या झोपडपट्टीपासून मलबार हिलच्या गर्भश्रीमंतापर्यंत सगळ्या थरातले लोक इथं राहतात. मात्र राजधानीचा भाग असूनही इथल्या अनेक समस्या कायम आहेत.
दक्षिण मुंबईतल्या समस्या
ट्रॅफिक जॅम ही दक्षिण मुंबईतील (South Mumbai) सर्वात मोठी समस्या आहे. गिरणगावातील अनेक इमारती जुन्या झाल्यात, मोडकळीस आल्यात. त्या चाळींचा पुनर्विकास हा मोठा प्रश्न आहे. अभ्युदयनगरसारख्या वसाहतींचा पुनर्विकास देखील रखडलाय. बीडीडी चाळ पुनर्विकासाचं काम धीम्या गतीनं सुरू आहे. कोस्टल रोड आणि मेट्रोच्या कामांमुळं नागरिक त्रस्त आहेत.
दक्षिण मुंबईचं राजकीय गणित
स. का. पाटील, जॉर्ज फर्नांडिस, मुरली देवरा अशा दिग्गजांनी दक्षिण मुंबईचं लोकसभेत प्रतिनिधीत्व केलंय. कधीकाळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र अलिकडच्या काळात शिवसेनेनं तो काबीज केला. 2009 मध्ये काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी मनसेच्या बाळा नांदगांवकरांचा सव्वा लाख मतांनी पराभव केला. 2014 मध्ये मोदी लाटेचा फायदा घेत शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार झाले. त्यांनी मिलिंद देवरांना हरवलं. 2019 मध्ये देखील याच निकालाची पुनरावृत्ती झाली. विधानसभेचा विचार केला तर शिवसेना ठाकरे गटाचे 2, भाजपचे 2, शिवसेना शिंदे गटाचा 1 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे.
अरविंद सावंत वि. यामिनी जाधव
शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आलीय. ते विजयाची हॅटट्रिक करणार का? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. दुसरीकडं महायुतीने यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना या मतदारसंघातून संधी दिली आहे. या मतदारसंघात भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्ची होती. पण हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात शिंदे गटाला यश आलंय. यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव हे दोघेही शिवसेनेत सक्रिय आहेत. शिवसैनिक ते आमदार असा यामिनी जाधव य़ांचा प्रवास राहिला आहे. 2012 मध्ये यामिनी जाधव नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यानंतर 2019मध्ये त्यांना शिवसेनेने भायखळ्यातून तिकीट दिलं. एमआयएमच्या वारिस पठाण यांना पराभूत करून त्या आमदार झाल्या. शिवेसेनेत दोन गट पडल्यानंतर त्या शिंदे गटात सहभागी झाल्या.
मराठी टक्का
इथं मराठी मतांचा टक्का मोठा आहे. ठाकरेंच्या उमेदवाराचा पाडाव करण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेला ही जागा सोडावी, असाही विचार महायुतीत सुरु होता. बाळा नांदगांवकर किंवा अमित ठाकरे उमेदवार असतील, अशीही चर्चा होती. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केलीय.