मोहिते पाटलांना टार्गेट करत राष्ट्रवादीची मुंबईत पोस्टरबाजी
या पोस्टरमधून मोहिते पाटील आणि भाजपाची उडवली खिल्ली उडवली गेलीय
मुंबई : 'बुरा ना मानो होली है' म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मुंबईत पोस्टरबाजी केलीय. या पोस्टरमधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना टार्गेट करण्यात आलंय. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशावर ही पोस्टरबाजी करण्यात आलीय. या पोस्टरमधून मोहिते पाटील आणि भाजपाची उडवली खिल्ली उडवली गेलीय.
'ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले, त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार' असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आलाय. उल्लेखनीय म्हणजे, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुंबईतील घरासमोरील ही पोस्टर लावण्यात आली आहेत.
बुधवारी रणजितसिंह मोहिते पाटलांनी आपले वडील विजयसिंह मोहिते पाटील वगळता सर्व कुटुबीयांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केलाय. शेकडो समर्थकांसह रणजितसिंह भाजपात दाखल झालेत. त्यापूर्वी त्यांनी गिरीश महाजनांची भेट घेतली. रणजितसिंह यांच्यासोबतच धैर्यशील मोहिते पाटील (चुलतभाऊ), माळशिरस पंचायतमधील वैष्णोदेवी मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनीही यावेळी भाजप प्रवेश केला. सोलापूरच्या राजकारणाला यामुळे मोठा हादरा बसलाय. यापूर्वी, भाजपाप्रवेश करण्याआधी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 'झी २४ तास'ला एक्स्लुझिव्ह मुलाखत दिली. 'पक्षातल्या घुसमटीमुळे नाही तर मोदींच्या करिष्म्यामुळे प्रभावित होऊन भाजपा प्रवेश करत असल्याचं' त्यांनी यावेळी म्हटलं होतं.