मुंबई : लोकसभा निडवणूक २०१९ साठी काँग्रेसनं 'उत्तर मध्य मुंबई' मतदार संघातून काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांना पुन्हा एकदा संधी दिलीय. मंगळवारी काँग्रेसच्या २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात प्रिया दत्त यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. 'हो, मी ही निवडणूक लढणार आहे... माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी मी निवडणूक लढतेय... लोकशाही वाचवण्यासाठी मी ही निवडणूक लढतेय' असं प्रिया दत्त यांनी म्हटलंय.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या यादीत महाराष्ट्रातल्या पाच उमेदवारांचा समावेश आहे तर उत्तर प्रदेशातल्या १६ उमेदवारांचं नाव आहे. यामध्ये, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांना तर दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरांना तिकीट देण्यात आलंय. नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोलेंना मैदनात उतरवलंय, सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, गडचिरोलीतून नामदेव उसेंडी यांना उमेदवारी देण्यात आलीय. उत्तर प्रदेशात मोरादाबादमधून राज बब्बर यांना तर कानपूरमधून माजी केंद्रीयमंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांना उमेदवारी दिलीय. भाजपातून बंडखोरी केलेल्या खासदार सावित्री फुले यांनाही काँग्रेसनं उमेदवारी दिलीय. 



याअगोदर, वर्षाच्या सुरुवातीलाच प्रिया दत्त यांनी एक निवेदन जारी करत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. प्रिया दत्त आणि पती ओवेन रॉनकॉन या दाम्पत्याला सिद्धार्थ आणि सुमेर अशी दोन मुलं आहेत. 'माझ्या आयुष्यातील गेली काही वर्षे उत्कंठावर्धक आणि खूप काही शिकवणारी होती. मात्र, या सगळ्यात मला राजकीय व वैयक्तिक जीवनाचा मेळ साधण्यात बरीच कसरत करावी लागत आहे. तरीही मी शक्य तितकी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या सगळ्यामुळे माझ्या आयुष्यातील इतर गोष्टींसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही' असं या निवेदनात प्रिया दत्त यांनी म्हटलं होतं. परंतु, मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. 


प्रिया दत्त या वडील सुनील दत्त यांच्या मृत्यूनंतर राजकारणात उतरल्या होत्या. २००५ साली १४ व्या लोकसभेत त्या पहिल्यांचा काँग्रेसच्या तिकीटावर 'उत्तर मध्य मुंबई' मतदार संघातून निवडून गेल्या. त्यानंतर २००९ साली प्रिया दत्त या भाजप नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन हिचा पराभव करत पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आल्या. २०१४ साली मात्र प्रिया दत्त यांना पराभव स्वीकारावा लागला होता.