मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपच्या किरीट सोमय्यांना उमेदवारी देण्यावरून निर्माण झालेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. भाजपने ऐनवेळी किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिलीच तर शिवसेनेने सुनिल राऊत यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी ठेवली आहे. सुनिल राऊत हे सध्या भांडुप विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. एवढेच नव्हे तर उमेदवारीचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाण्याचीही तयारी केली होती. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमय्यांना भेट नाकारल्याचे वृत्त आहे. परिणामी किरीट सोमय्या यांच्यापुढील अडचणी वाढल्या असून त्यांची पुरती कोंडी झाली आहे. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्थात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. किरीट सोमय्या या मतदारसंघाच विद्यमान खासदार आहेत. मात्र, मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्यात शेलक्या शब्दांत टीका केल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांनी त्यांच्या नावाला जोरदार विरोध दर्शवला होता. सोमय्यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेची मते राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडे वळू शकतात. त्यामुळे भाजपकडून अजूनही ईशान्य मुंबईतील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यांच्याऐवजी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुंबई पालिकेतील नेते मनोज कोटक आणि प्रवीण छेडा यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु आहे.