Mumbai North East Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: भाजपचा बालेकिल्ल्यात मशाल पेटली, ठाकरे गटाच्या संजय दीना पाटील यांचा विजय
North East Mumbai Lok Sabha Election Result 2024: भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा विजय झाला आहे.
North East Mumbai Lok Sabha Election Result 2024: भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा विजय झाला आहे. ईशान्य मुंबईत संजय दीना पाटील आणि मिहीर कोटेचा यांच्यात लढत झाली. अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संजय दीना पाटील यांनी बाजी मारली आहे. यामुळे भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांना मोठा धक्का बसला आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात संजय दीना पाटील यांना 3 लाख 89 हजार 065 मते मिळाली आहेत. तर मिहीर कोटेचा यांना 3 लाख 61 हजार 820 मते मिळाली आहेत. संजय दीना पाटील हे 27 हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. ईशान्य मुंबईत गेले दोन टर्म म्हणजेच 2014 मध्ये किरीट सोमय्या आणि 2019 मध्ये मनोज कोटक ईशान्य मुंबईतून खासदार झाले होते. त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ सोपा मानला जात होता. पण अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संजय दीना पाटील यांनी विजयी गुलाल उधळला आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड केल्यामुळे या मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन यांतील काही तांत्रिक अडचणी वगळता या ठिकाणी शांततेत मतदान झाले. या भागात 94 हजार 378 पुरुष, तर 85 हजार 357 महिलांनी मतदान केले. ईशान्य मुंबईत एकूण 16 लाख 36 हजार 890 मतदार आहेत. त्यापैकी फक्त 9 लाख 22 हजार 760 मतदारांनी मतदान करण्यास उत्साह दाखवला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभेच्या अंतर्गत असलेल्या तीन मतदारसंघात भाजप आणि दोन मतदारसंघात शिवसेना आणि एका मतदारसंघात समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी झाला होता.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक हे 2 लाख 26 हजार 486 मतांनी विजयी झाले होते. तर मनोज कोटक यांना 5 लाख 14 हजार 599 मते मिळाली. तर, राष्ट्रवादीचे संजय दीना पाटील यांना दोन लाख 88 हजार 113 मते मिळाली होती. तर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निहारिका खोंडलाय यांना 68 हजार 539 मते मिळाली होती.