Loksabha Election 2024 : सरकारी कर्मचारी ते माजी मंत्री... अरविंद सावंत यांना का मिळाली दक्षिण मुंबईतून उमेदवारी?
Loksabha Election 2024 : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं बुधवारी पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुंबईच्या 4 जागांसह एकूण 17 उमेदवारांची नावं पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आली. यामध्ये दक्षिण मुंबई मतदार संघातून माजी मंत्री अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षानं घेतल्याचं स्पष्ट झालं. या मतदार संघासाठी आधीपासूनच अरविंद सावंत यांचं नाव चर्चेत होतं. ज्यानंतर आता उमेदवार यादी जाहीर झाल्यामुळं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यांच्याविरोधात आता महायुतीचा कोणता उमेदवार उभा राहणार हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, 'तिसऱ्यांदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी दिली याबद्दल मी उद्धव ठाकरे आणि आमच्या पक्षाचे सर्व नेत्यांचे आभार मानतो. निवडणुकीमध्ये लढाई लढाई असते मी कधीही कोणाला कमी लेखणार नाही. आमची 17 उमेदवारांची जी यादी जाहीर झाली ती विजयी उमेदवारांची यादी आहे असं मी मानतो', अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली.
अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीसंदर्भातील अनेक प्रश्न शहरातील या अतीव महत्त्वाच्या मतदारसंधघातील मतदारांना पडत आहेत. त्याच काही प्रश्नांच्या उत्तरांसह सावंत यांची राजकीय कारकिर्द खालीलप्रमाणं...
सरकारी कर्मचारी ते माजी मंत्री...
एका सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य असणाऱ्या अरविंद सावंत यांनी महानगर टेलीफोन निगम लिमिटेड (MTNL) मध्ये नोकरी केली. 90 च्या दशकात अगदी सुरुवातीलाच त्यांनी एमटीएनएलमध्ये शिवसेनेची युनियन अर्थात कामगार संघटना स्थापन करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आणि याच दशकाअखेर त्यांनी नोकरीवर पाणी सोडून सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
2002 मध्ये अरविंद सावंत महाराष्ट्रातील विधान परिषदेवर निवडून आले. मुंबई शहरातील झोपडपट्टीचा विकास, मिल कामगारांच्या घरांचे प्रश्न आणि सरकारी कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर यांसारखे मुद्दे त्यांनी कायमच उचलून धरल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेमध्ये त्यांनी दोन कार्यकाळ गाजवले. पण, शहरात तिसऱ्यांदा मात्र त्यांना निवडणुकीच्या रिंगणात पराभवाचा सामना करावा लागला होता.
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू...
पाहता पाहता उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू व्यक्तींमध्ये त्यांनी स्थान मिळवलं आणि पक्षाच्या प्रवक्तेपदावर असणाऱ्यांमध्ये त्यांना स्थान मिळालं. पक्षावर होणारे आघात परतवून लावत ज्यावेळी शिवसेना पक्षांतर्गत कलह आणि मतभेदांशी सामना करत होती तेव्हा त्यांनी पक्षाला सर्वतोपरी साथ दिली.
हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सरसकट भरपगारी रजा; तुमच्या जिल्ह्यात सुट्टी कधी?
2014 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंनी अरविंद सावंत यांना पसंती दिली. पण, काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांच्यापुढं मात्र त्यांचं आव्हान कमी ताकदीचं समजलं जात होतं. असं असलं तरीही त्यावेळी पक्षाची भाजपशी युती असल्यामुळं त्याता थेट फायदा सावंत यांना झाला आणि याचीच पुनरावृत्ती 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पाहायला मिळाली.
पुढे शिवसेनेमध्ये मतमतांतरं झाली आणि एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीसहून अधिक आमदारांनी पक्षाची साथ सोडली. अरविंद सावंत यांनी मात्र पक्षाशी या आव्हानाच्या वेळीसुद्धा एकनिष्ठ राहत आपल्या जबबादाऱ्या पार पाडल्या. याच अरविंद सावंत यांना आता शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब गटानं दक्षिण मुंबई मतदार संघातून उमेदवारी जाहीर केल्यामुळं ते मशाल या चिन्हावर ही निवडणूक लढवणार आहेत. इथं त्यांना महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध करडी झुंज द्यावी लागणार आहे.