Loksabha Election 2024 : महायुतीला आपला बिनशर्त पाठिंबा असल्याचं जाहीर वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं. समर्थक आणि विरोधकांच्या प्रतिक्रियाही येण्यास सुरुवात झाली. यामध्ये महायुती आणि मनसे या समीकरणावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीसुद्धा लक्षवेधी वक्तव्य केलं. (raj thackeray) राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेला पाठिंबा आमचा विश्वास वाढवणारा असल्याचं खोचक वक्तव्य त्यांनी केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पावित्र्याची व्याख्याच बदलल्याचंही त्या म्हणाल्या. 'एकिकडे राजकीय व्याभिचाराला समर्थन नाही, असं म्हणताना तुम्ही ज्यांनी व्हाया सुरत गुवाहाटी करत कूटनितीने खोक्यांचं राजकारण करत इथे सरकार बदलवलं या लोकांना पावित्र्याच्या कोणत्या व्याख्येत बसवता?' असा खडा सवाल करत शिंदे गटावरही सणसणीत टीका केली. 


एकिकडे व्याभिचाराची भाषा करता आणि दुसरीकडे पावित्र्याचं स्टँडर्डच बदलता, असा टोला लगावत त्यांनी राज ठाकरे यांचा हा निर्णय संविधानप्रेमी महाराष्ट्रातील जनतेला पटणार नसल्याचं स्पष्टच सांगितलं. 



महायुतीला पाठिंबा... आम्हाला आनंद आहे


माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी महायुतीला पाठिंबा देणं म्हणजे आमच्यासाठी आनंदाचीच बाब असल्याच्या आशयाचं वक्तव्य अंधारे यांनी केलं. 'आम्हाला आनंद आहे... आमच्यावर याचा काही परिणाम होईल किंवा आम्ही खचून जाऊ असं काहीच नाही. हा पाठिंबा आमचा विश्वास वाढवणारा असून, 84 वर्षीय वयोवृद्ध योद्ध्याला आणि एका घायाळ वाघाला हरवण्यासाठी इतकी मोठी ताकद लावतात त्या अर्थी त्यांना (महायुतीला) अजूनही महाराष्ट्रात आपण जिंकू अशी खात्री वाटत नाहीये', असं सांगताना मतं वळवण्यासाठी म्हणून महायुतीनं राज ठाकरे यांचा पाठिंबा मिळवल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या दिले. 


हेसुद्धा वाचा : शरद पवारांचे मराठा कार्ड! साताऱ्यासह 'या' जागेवर उमेदवाराची घोषणा; माढाचा सस्पेन्स कायम


 


एकनाश शिंदे यांचा पक्ष जर, खरी शिवसेना असती, तर त्यांनी लागलीच उमेदवार घोषित केले असते. ज्या माणसाला इतरांचं सोडा पण स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करण्याचंही भाग्य मिळू नये त्यांच्याबद्दल असली आणि नकली असा वाद घालायचा प्रश्नच येत नाही, या शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला कडाडून विरोध केला. 


भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या आक्षेपार्ह वकत्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, 'एकंदरच मुनगंटीवार किंवा भाजपाई लोकांवरील मूळ संस्कार ते आता दाखवू लागले आहेत किंबहुना त्यांचं वक्तव्य भाजपच्या मूळ संस्कृतीचच प्रदर्शन आहे' असंही त्या म्हणाल्या.