CM शिंदेंच्या मुलाला `विजयी हॅट-ट्रीक`पासून रोखण्यासाठी ठाकरेंचा वेगळाच डाव; कल्याणमध्ये आयात उमेदवार?
Loksabha Election 2024 Kalyan Constituency: कल्याण मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. यंदा श्रीकांत शिंदेंकडे विजयाची हॅट-ट्रीक साधण्याची संधी आहे. मात्र असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाने श्रीकांत शिंदेंविरुद्ध उमेदवारासंदर्भात एक वेगळा विचार सुरु केला आहे.
Loksabha Election 2024 Kalyan Constituency: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण मतदारसंघामध्ये त्यांच्या खासदारपुत्राविरुद्ध कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे याबद्दल महाविकास आघाडीत एकमत झालेले नाही. श्रीकांत शिंदेंसारख्या प्रबळ उमेदवाराविरुद्ध नेमकं कोणाला निवडणुकीत उतरवावं यासंदर्भातील चाचपणी सुरु आहे. सध्या तरी स्थानिक पातळीवर ठाकरे गटाबरोबरच महाविकास आघाडीकडे कोणताही आश्वासक चेहरा नसल्याने आयात उमेदवार या मतदारसंघात द्यावा लागणार असं निश्चित मानलं जात आहे. या मतदारसंघातून संभाव्य उमेदवार अगदी उद्धव ठाकरेंच्या नात्यातील वरुण सरदेसाईंपासून ते ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र या दोघांकडून नकार आल्याने आता शिंदेंच्या राजकीय गुरुंच्या घरातील वंशजच शिंदे गटाविरुद्ध मैदानात उतरवण्याचा ठाकरे गटाचा मानस आहे.
कोणाला निवडणुकीत उतरवणार ठाकरे गट?
सध्या ठाकरे गटाकडून ज्या व्यक्तीला उमेदवारी देण्याची चर्चा आहे त्या उमेदवाराचं नाव आहे केदार दिघे! एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघेंचे पुतणे असलेले केदार दिघे हे शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाण्यामध्ये ठाकरे गटाची बाजू सातत्याने लावून धरत आहेत. एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे शिष्य म्हणून ओळखले जातात. अगदी चित्रपटापासून ते दर कार्यक्रमामध्ये शिंदे आवर्जून आनंद दिघेंचा उल्लेख करतात. त्यामुळेच शिंदेच्या पुत्राची लढत त्यांच्या गुरुंच्या घरातील व्यक्तीबरोबर व्हावी असं उद्धव ठाकरे गटाचं नियोजन असल्याचं समजतं. मात्र असं असलं तरी स्थानिक पातळीवर केदार दिघे हे किती प्रभावी ठरतील याबद्दल उद्धव ठाकरे गटामध्येच मतमतांतरे आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून शिंदेंच्या बंडानंतर त्यांच्याकडे जो पदभार होता तो म्हणजेच ठाणे जिल्हाप्रमुखपदाचा पदाभर केदार दिघेंकडे सोपवण्यात आला. मात्र या पदावर काम करताना केदार दिघेंना फारशी छाप पाडता आलेली नाही. त्यामुळेच केदार दिघेंना उमेदवारी देण्याबद्दल उद्धव ठाकरे गट उत्सुक असला तरी महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांची त्याला सहमती मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याची चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे.
6 विधानसभा मतदारसंघ असलेला लोकसभा मतदारसंघ
कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आवाका फारच मोठा आहे. ठाणे शहराच्या सीमेला लागून असलेल्या कळवा-मुंब्रापासून ते अगदी अंबरनाथपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. विधानसभेचे सहा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. मात्र यामध्येही महायुतीच्या आमदारांचा दबदाबा दिसून येतो. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आहेत. तर डोंबिवली मतदारसंघ संघाचे आमदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले रविंद्र चव्हाण आहेत. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा कल्याण ग्रामीण मतदारसंघही कल्याण लोकसभा मतदारसंघाचाच भाग आहे. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा कल्याण पूर्व मतदारसंघ. कुमार आयलानी आमदार असलेला उल्हासनगर मतदरासंघही कल्याण लोकसभा मतदारसंघातच येतो. कल्याण लोकसभा मतदारसंघ संपतो तिथे म्हणजेच अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे बालाजी किणीकर आमदार आहेत.
शिंदेंनी पिंजून काढलेला मतदारसंघ
कल्याण लोकसभा मतदारसंघातून 2014 साली मोदी लाटेत श्रीकांत शिंदे पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा श्रीकांत शिंदेंनीच बाजी मारली होती. दोन्ही वेळेस त्यांचे वडील आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुलाच्या विजयासाठी मतदारसंघ पिंजून काढला होता.