Maharashtra Worli Lok Sabha Election 2024:  उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बूथ एजंट मनोहर नलगे यांचा सोमवारी मतदानकेंद्रावरच दुर्देवी मृत्यू झाला. डिलाईड रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक 20 च्या म्हसकर उद्यानातील पुलिंग बूथवर नलगे पोलिंग एजंट म्हणून काम करत होते. नलगे यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना ब्रॉट डेड म्हणजेच दाखल करण्याआधीच मृत घोषित केलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानकेंद्रावर पुरेश्या सोयीसुविधांचा आभाव होता. निवडणूक आयोगाने या ठिकाणी हव्या तशा सोयीसुविधा पुरवल्या नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.


62 वर्षांचे होते नलगे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोहर नलगे 62 वर्षांचे होते ते मुंबईतील डिलाईड रोड येथील एन. एम. जोशी मार्गावरील बीडीडी चाळमधील म्हसकर उद्यानाजवळ राहायला होते. सोमवारी मुंबईतील सर्व लोकसभा मतदासंघांमध्ये पाचव्या टप्प्याअंतर्गत मतदान पार पडलं. राज्यातील 13 मतदारसंघांमध्ये मुंबईतील 6 मतदारसंघांचा समावेश होता. महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी ही सोमवारी 5 राज्यांतील एकूण 49 मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानात सर्वात निच्चांकी राहिली. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये गोंधळ, मतदानासाठी वेळ लागत असल्याने लांबच लांब रांगा, विरोधक कार्यकर्ते आमने-सामने येऊन झालेली घोषणाबाजी यासारख्या गोष्टी चर्चेत राहिल्या. अनेक मतदानकेंद्रांवर पुरेश्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नव्हत्या असा दावा केला जात आहे.


आदित्य ठाकरे म्हणाले पुरेश्या सुविधा नाहीत


आदित्य ठाकरेंनीही अनेक ठिकाणी किमान मूलभूत सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नव्हत्या असा दावा केला आहे. मतदानकेंद्रावर आरोग्यासंदर्भातील सुविधाही उपलब्ध नसल्याचं ते म्हणाले. "मुंबईत आज मतदान सुरु आहे. मात्र अनेक मतदानकेंद्रावर लोकांना त्रास सहन करावा लागतोय. अनेक ठिकाणी मूलभूत सुविधाही नाहीत. बऱ्याच ठिकाणी ईव्हीएममध्ये गोंधळ दिसून येत आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले. या प्रकरणांची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.


नलगे टॉयलेटमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले


उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी नलगे यांच्या मृत्यूनंतर केईएम रुग्णालयाला भेट दिली. "मनोहर नलगे यांचा मृत्यू मतदानकेंद्रावरच झाला होता. सहा वाजायला 10 मिनिटं कमी असतात नलगे वॉशरुममध्ये गेले होते. मात्र ते परतलेच नाहीत. बॅलेट बॉक्स बंद करताना पोलिंग बूथ एजंटची स्वाक्षरी लागते. त्यावेळेस आम्ही नलगेंचा शोध सुरु केला. ते टॉयलेटमध्ये बेशुद्धावस्थेत पडले होते. आम्ही त्यांना रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं," असं शिंदे म्हणाले. 


आदित्य ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली


नलगे यांच्या निधनाबद्दल आदित्य ठाकरेंनीही आपल्या एक्स अकाऊंटवरुन शोक व्यक्त केला आहे. "कडवट शिवसैनिक मनोहर नलगेजी यांचं आज मुंबईत पोलिंग बूथवर काम करताना हृदयविकाराचा धक्का येऊन निधन झाल्याचं समजलं. डिलाईड रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक 20 च्या म्हसकर उद्यानातील पुलिंग बूथवर नलगेजी पोलिंग एजंट म्हणून काम करत होते. ही बातमी अत्यंत धक्कादायक होती. मनोहर नलगेजींना भावपूर्ण श्रद्धांजली," असं आदित्य यांनी म्हटलं आहे.



निवडणूक अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये अन्य एका ठिकाणी 56 वर्षीय निवडणूक अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सुनील लक्ष्मण असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते परेलमधील भोईवाड्यातील सेंट पॉल्स हायस्कूलमधील मतदानकेंद्रावर कार्यरत होते. सेवा बजावत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने सुनील यांना केईएम रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.