दक्षिण मुंबईची जागा मनसेला देणार? दिल्लीत महत्वाच्या हालचालींना वेग
Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे मनसेला एक जागा मिळणार असल्याची शक्यता आहे.
Loksabha Election: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. युती,आघाडींनी जोर धरलाय. काही दिवसांपुर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली होती. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीसोबत जाण्याची दाट शक्यता आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झाली नसली तरी महायुतीचे जागावाटपाचे समिकरण हळुहळू समोर येऊ लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे मनसेला एक जागा मिळणार असल्याची शक्यता आहे. ही जागा दक्षिण मुंबईतील असू शकते. सध्या हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे. तेथे अरविंद सांवत खासदार असून त्यांची लढत महायुतीतील पक्ष भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि संभाव्य मनसे विरुद्ध असू शकते.
मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश
भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीदेखील दक्षिण मुंबईतून तयारी केली होती. पण आता मनसेला ही जागा दिली जाण्याची शक्यता आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांना येथून उमेदवारी दिली जाऊ शकते. बाळा नांदगावकर हे दक्षिण मुंबईतील माजी आमदार आहेत. त्यांनी शिवसेनेच्या दगडू सकपाळ यांचा पराभव करत येथे ऐतिहासिक विजय मिळवला होता. आता मनसेला महायुतीची साथ मिळाली तर बाळा नांदगावकर पुन्हा इतिहास घडवणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.