विखे पाटील संभ्रमात, `हात` सोडून `कमळ` घेणार?
राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे.
शिर्डीहून प्रशांत शर्मासह दीपक भातुसे, झी २४ तास मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे. शिर्डीत ते मोदींचं फोटो लावण्याची गोष्ट करतात. तर मुंबईत मोदींवर टीका करतात. विखे पाटील येत्या काळात काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हातात घेतील की काय अशी स्थिती आहे.
अहमदनगर जिल्ह्यातलं दिग्गज घराणं म्हणून विखे-पाटील घराण्याकडं पाहिलं जातं. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे-पाटील आणि सुजय विखे पाटील हे बापलेक संभ्रमात असल्याचं चित्र आहे. सुजय विखेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा हट्ट धरलाय. लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस सो़डण्यासही सुजय तयार आहेत. मात्र भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नसल्याचं ते काही दिवसांपूर्वी छातीठोकपणे सांगत होते.
दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटलांचं भाजपप्रेम मात्र कमी झालं नाही. वेळ आली तर उज्ज्वला योजनेतल्या गॅस सिलेंडरवरील मोदींचा फोटो लावायला लागतील असं सांगून त्यांनी संभ्रम निर्माण केला.
आदल्या दिवशी मोदींबाबत ममत्व दाखवणाऱ्या विखे पाटलांनी दुसऱ्याच दिवशी सरकारवर हल्लाबोल केला. पण जेव्हा त्यांना नगरमधील वक्तव्याबाबत विचारलं तेव्हा मात्र त्यांनी थोडासा बचावात्मक पवित्रा घेतला.
मी विरोधी पक्षनेता असल्याने आ़णि ती जागा माझ्या मुलासाठी सुटत नाही त्यामुळे या मतदारसंघाची एवढी चर्चा सुरू झाली आहे. माझा मुलगा म्हणून बोलत नाही, पण आपल्यामध्ये धमक आहे, असे कार्यकर्त्याला वाटत असेल तर त्याला संधी का मिळू नये? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. तसंच मागच्या तीन वेळा या जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाल्यामुळे आम्ही या जागेची मागणी करतोय, असं विखे पाटील यांनी सांगितलं.
नगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीची अद्याप तयारी नाही. मात्र दुसरीकडे काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याच्या राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्यासाठी मात्र नगरची जागा काँग्रेसला द्यायला राष्ट्रवादीचा विरोध आहे. त्यामुळे नाराज सुजय विखे भाजपात जाणार असल्याची नगर जिल्ह्यात चर्चा आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात विखे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. सुजय विखे भाजपात गेले तर राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.
मुलाचं भवितव्य घडवण्याच्या नादात राधाकृष्ण विखे पाटील स्वतःचं राजकीय भवितव्य पणाला लावतायत. एकाच वेळी अनेक दगडांवर पाय ठेवण्याचा विखे-पाटील बापलेकांचा हा प्रयत्न त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. हे माहित असल्यानेच कदाचित विखे याबाबत पुन्हा पवारांशी चर्चा करायला तयार आहेत.