ठाणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी आणि सुशिक्षित लोकांचं शहर अशी ख्याती असणाऱ्या डोंबिवलीत विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक कमी मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात सरासरी ४७.९१ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामध्ये डोंबिवलीत सर्वाधिक कमी म्हणजे ४०.७२ टक्के इतके मतदान झाले. तर कल्याण पश्चिममध्ये ४१.७४ टक्के, कल्याण पूर्व ४३.५५ आणि कल्याण ग्रामीणमध्ये ४६.३७ टक्के इतके मतदान झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवलीत यंदा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि मनसेच्या मंदार हळबे यांच्यात लढत रंगली होती. चहुबाजूंनी पडलेला वाहनकोंडीचा विळखा, जागोजागी उखडलेले रस्ते, प्रदूषणाचा वाढता आलेख, फेरीवाल्यांचा उपद्रव, रिक्षाचालकांची मनमानी यासारख्या समस्यांमुळे रवींद्र चव्हाण यांना फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे लोकांकडून मतदानाच्या माध्यमातून उत्स्फुर्तपणे निषेध नोंदवला जाईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र नागरिकांनी मतदानाकडे साफ पाठ फिरवल्याचे दिसून आले.


विधानसभा निवडणुकीच्या एकूण मतदानावर नजर टाकल्यास शहरी भागांमध्ये मतदारांचा निरुत्साह दिसून आला. तर ग्रामीण भागातील लोकांना आपली मतदानाची जबाबदारी चोखपणे पार पाडली. मुंबई शहर जिल्ह्य़ात ४८.६३ टक्के तर मुंबई उपनगरात ५१.१७ टक्के मतदान झाले. मुंबईत सरासरी ५० टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात मुंबईतील मतदानाची आकडेवारी १० टक्क्यांच्या आत होती. मात्र, यानंतर मतदार घराबाहेर पडल्याने मुंबईतील मतदानाची टक्केवारी कशीबशी ५० टक्क्यांपर्यंत पोहोचली. 



लोकसभा निवडणुकीतही मुंबईत ५० ते ५२ टक्के एवढेच मतदान झाले होते. नागपूर शहरातही कमी मतदान झाले. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७४ टक्के इतके मतदान झाले. संपूर्ण राज्यात सरासरी ६०.४६ टक्के मतदान झाले.