आता LPG सिलिंडरची डिलिव्हरी हवी तेव्हा उपलब्ध होणार! जाणून घ्या काय आहेत नियम
LPG सिलिंडर बुक करणं आणि डिलिव्हरी घेणं आता पूर्वीपेक्षा खूप सोपे आणि वेगवान झाले आहे
मुंबई : LPG सिलिंडर बुक करणं आणि डिलिव्हरी घेणं आता पूर्वीपेक्षा बरंच सोपे झालं आहे. याआधी ग्राहकांना बुकिंगसाठी बराच काळ कॉलवर थांबावं लागत होतं तर डिलिव्हरीसाठी एक आठवडा वाट पाहावी लागत होती. पण आता तुम्ही LPG सिलिंडर फक्त एका मिस्ड कॉलने बुक करू शकता. आणि त्याच दिवशी तुम्हाला डिलिव्हरी देखील मिळू शकते. पण यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावं लागणार आहे.
भरावे लागणार शुल्क
इंडेन गॅस सर्व्हिसने (Indane Gas Service) आपल्या ग्राहकांसाठी एक सेवा सुरु केली आहे. ग्राहकांना LPG सिलेंडर कधी आणि कोणत्या वेळी हवे आहेत हे ग्राहक ठरवू शकतात. म्हणजेच ते त्यांच्या पसंतीच्या वेळी सिलिंडरची डिलिव्हरी घेऊ शकतात. या 'Preferred Time Delivery system' अंतर्गत, ग्राहकांना बुकिंगच्या वेळी दिवस आणि वेळ दोन्ही निवडता येणार आहे. मात्र, यासाठी इंडेन गॅस सर्व्हिस ग्राहकांकडून छोटसं शुल्कही आकारतं.
या प्रणाली अंतर्गत, इंडेनचे सिलेंडर सोमवार ते शुक्रवार अर्थात आठवड्याच्या कोणत्याही दिवशी वितरित केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाला एका ठराविक दिवशी डिलिव्हरी हवी आहे आणि डिलिव्हरीची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान निश्चित केली आहे, तर सिलिंडर तुम्हाला त्याच दिवशी आणि त्याच वेळेत वितरित केला जाईल. जर ग्राहकाने फक्त टाइम स्लॉट निवडला असेल पण दिवस निवडला नसेल तर सिलिंडर सोमवार ते शुक्रवार दरम्यान निवडलेल्या टाइम स्लॉटमध्ये वितरित केला जाईल.
जर ग्राहकांना शनिवार-रविवारी म्हणजेच वीकेंडला डिलिव्हरी हवी असेल, तर ग्राहक सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या वेळेत कोणताही वेळ निवडू शकतात आणि डिलिव्हरी घेऊ शकतात. जे लोक सोमवार-शुक्रवारी ऑफिसला जातात किंवा कामानिमित्त बाहेर असतात त्यांच्यासाठी ही सुविधा अतिशय सोयीची आहे.
किती भरावे लागणार शुल्क
जर तुम्हाला सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत डिलिव्हरी घ्यायची असेल तर तुम्हाला 25 रुपये द्यावे लागतील.
जर तुम्हाला सोमवार ते शुक्रवारदरम्यान संध्याकाळी 6 ते रात्री 8 दरम्यान डिलिव्हरी घ्यायची असेल तर तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील
जर तुम्हाला सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी 8 च्या आधी डिलिव्हरी घ्यायची असेल तर तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.
जर तुम्हाला शनिवारी आणि रविवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 दरम्यान डिलिव्हरी घ्यायची असेल तर तुम्हाला 25 रुपये मोजावे लागतील.