अधिकृत रेशन दुकानात मिळणार महानंद दुग्धशाळेचं दूध
मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अधिकृत रास्त भाव दुकानातून महानंद दुग्धशाळेचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकत मिळणार आहेत. याबाबतचा सरकारी निर्णय नुकताच जाहीर करण्यात आलाय.
मुंबई : मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अधिकृत रास्त भाव दुकानातून महानंद दुग्धशाळेचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकत मिळणार आहेत. याबाबतचा सरकारी निर्णय नुकताच जाहीर करण्यात आलाय.
रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित होणा-या वस्तूंसह गव्हाच्या विशिष्ट जाती, तांदळाच्या विशिष्ट जाती, खाद्यतेल, पामतेल, कडधान्ये, डाळी गहू, शेंगदाणे, रवा, मैदा, चणाडाळ व भाजीपाला इत्यादी वस्तू त्याचप्रमाणे प्रमाणित बी-बियाणे विक्रीसाठी परवानगी देण्यात आली होती.
याच धर्तीवर महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री होणार आहे. महानंद दुग्धशाळा योजनेप्रमाणे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीपोटी मिळणा-या कमिशनसाठी संबधित रास्तभाव दुकानदारांनी महानंद दुग्धशाळेच्या संबधित वितरकाशी परस्पर संपर्क साधणे अपेक्षित आहे. हा व्यवहार महानंद आणि रास्तभाव दुकानदार या दोघांत असणार आहे. यात सरकारचा कोणताही सहभाग किंवा हस्तक्षेप राहणार नाही.