कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल इथं 1 लाख 17 हजार 220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित 4 विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या प्रकल्पांमुळे सुमारे 29 हजार रोजगार निर्मिती (Employment Generation) होणार आहे. आज मान्यता दिलेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती (Electric Vehicle Manufacturing) क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी जुलै महिन्यात झालेल्या उपसमितीच्या बैठकीत 80 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात झालेल्या बैठकांमध्ये एकूण दोन लाख कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. ज्यामुळे 35 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. 


या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होण्यास मदत होणार आहे. सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा मोठया प्रमाणात फायदा होईल. स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांची रोजगारक्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.


टॉवर सेमीकंडक्टर कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प पनवेल रायगड इथं करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये  पहिल्या टप्प्यात 58 हजार 763 कोटी तर दुसऱ्या टप्यात रूपये 25 हजार 184 कोटी अशी एकूण 83 हजार 947 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. याप्रकल्पामुळे 15 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.


दरम्यान, 30 जुलै 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स यांच्या सेमीकंडक्टर निर्मितीच्या अतिविशाल प्रकल्पास  मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प सेमीकंडक्टर निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये लवकरच ओसॅट, चिप्स निर्मिती सुरू होणार आहे. आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स आणि टॉवर सेमीकंडक्टर कंपनी यांच्या प्रकल्पांमुळे प्रगत सेमीकंडक्टरची निर्मिती होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात महाराष्ट्र  भारताच्या अग्रस्थानी राहणार आहे. देशातील वाढती मागणी पुर्ण करणे व सेमीकंडक्टरची इकोसिस्टीम स्थापित करण्यास देखील चालना मिळणार आहे.


स्कोडा, ऑटो,  फोक्सवॅगन इंडिया कंपनीचा प्रकल्प पुणे इथं एकात्मिक पध्दतीने स्थापना करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये  एकूण 12 हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे एक हजार रोजगार निर्मिती होणार असून प्रकल्पातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रीक व्हेईकलचे निर्मिती केली जाणार आहे.  


टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचा प्रकल्प राज्याचे इलेक्ट्रीक वाहन प्रोत्साहन धोरणांतर्गत  इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 21  हजार 263 कोटी एवढी गुंतवणूक होणार असून त्यामाध्यमातून 12 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे  तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना  मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होईल.


मराठवाडयातील सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा फायदा होणार आहे. इलेक्ट्रीक वाहनाच्या वापरामुळे हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होऊन हवेची गुणवत्ता आणि हवामान बदल कमी होण्यास हातभार मिळणार आहे. 


यापूर्वी जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी यांचा छत्रपती संभाजीगनर इथं इलेक्ट्रीक वाहन निर्मितीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर यांचा इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये  मोठया प्रमाणात गुंतवणूक होणारा छत्रपती संभाजीनगर येथील दुसरा अतिविशाल प्रकल्प असून या क्षेत्राचा सर्वंकष विकास  होण्यास चालना मिळणार आहे.


रेमंड लक्झरी कॉटन्स यांचा वस्त्रोद्योग धोरणांतर्गत स्पिनींग, यार्न डाइंग, विव्हींग ज्यूट, विव्हींग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटन ह्या उत्पादनांच्या निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ नांदगाव पेठ, जि.अमरावती इथं होणार आहे. याप्रकल्पात 188 कोटी एवढी गुंतवणूक आणि 550 रोजगार निर्मिती होणार आहे.