दारु विक्री सुरु झाल्यानंतर महाराष्ट्राने तीन दिवसांत १०० कोटींहून अधिक महसूल मिळवला
राज्यातील एकूण दारु दुकानांपैकी केवळ एक तृतीयांश दारुची दुकानं सुरु होती.
मुंबई : देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३.० सुरु झाल्यानंतर ४ मेपासून कन्टेंन्मेंट झोन वगळता इतर भागात अटी-शर्तींसह दारु विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. महाराष्ट्रातही दारुची दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर तीन दिवसांत १०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवला असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी सांगितलं. राज्यातील एकूण दारु दुकानांपैकी केवळ एक तृतीयांश दारुची दुकानं सुरु होती. त्यातून उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी रात्रीपर्यंत १०० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवला असल्याचं ते म्हणाले.
मंगळवारी जवळपास १६.१० लाख लिटर आयएमएफएल (इंडियन मेड फॉरेन लिकर), बिअर, वाइन आणि देशी दारुची विक्री झाली. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत महापालिका आयुक्तांनी दारुची विक्री स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही हा कल कायम असल्याचं सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात दारु, आयएमएफएल, वाइन आणि बिअरची विक्री करणारी १००० हून अधिक परवानाधारक दुकानं असून त्यापैकी केवळ २९६७ दुकानं बुधवारी सुरु असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
मुंबईत गर्दीमुळे अखेर दारू विक्री पुन्हा बंद
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दारु विक्री सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत २९ लाख लिटर दारुची विक्री झाली असल्याचं एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु करण्यात आल्यानंतर जवळपास ४० दिवसांनी दारु विक्री सुरु करण्यात आली. सोमवारपासून दारुची दुकानं सुरु झाल्यानंतर मद्यपींच्या दारु दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ग्राहाकांकडून कोणत्याही नियमांचं, सोशल डिस्टंन्सिंगचं पालन होत नसल्याचं चित्र होतं. ग्राहकांची गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता.
मात्र मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पोलिसांनी लाठीचार्ज करण्याच्या किंवा ग्राहकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या घटना कमी झाल्याचं एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात रोज किती लिटर दारु लागते?