मुंबई : संविधान दिनाच्या दिवशीच महाराष्ट्रात 'न भूतो...' अशा घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं बंड पुरतं फसलं... राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात ते सपशेल अपयशी ठरल्यानं त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सुपूर्द केला. त्यानंतर फडणवीसांनी देखील राजीनामा दिल्यानं चार दिवसातच ते सरकार कोसळलं. परंतु, अजित पवार यांचं हे बंड महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडलेलं दिसतंय. अजित दाद पवार यांनी पाठिंब्याचं पत्र भाजपकडे सोपवल्यानंच भाजपकडून शनिवारी रात्रीच तातडीनं हालचाली करत राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली. तसंच अजित पवार यांच्या बंडामुळेच दोन आठवडे फक्त चर्चा करणारे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तीनही पक्षांचे नेते तात्काळ एकत्र आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं खुलं मतदान घेण्याचे आदेश दिल्यानंतर भाजपपुढे आणखीन मोठा पेचप्रसंग उभा राहिला. कारण खुल्या मतदानामध्ये आमदारांनी पक्षाचा व्हिप मोडण्याचं धाडस केलं नसतं. तसं केलं तर आमदारकी जाण्याचीही शक्यता होती. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या आमदारांकडून साथ मिळणार नसल्याचं पाहून अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची शक्यता गळून पडली आणि फडणवीसांनाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.


 



 


राजीनाम्यानंतर आता अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परतणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मंगळवारी संध्याकाळी ट्रायडंट हॉटेलात महाविकासआघाडीच्या आमदारांची बैठक होणार असून, या बैठकीला अजित पवार हजर राहणार असल्याचं समजतंय. यापुढं ते राजकीय संन्यास घेतील, अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. अजित पवार हे महाआघाडीत परतल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.


अजित पवारांच्या राजकीय नाटकाचा अंक 


१ शुक्रवारी रात्री राज्यपालांची भेट घेऊन भाजपाला पाठिंबा दिला 


२ शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ 


३ सुप्रियाताईंची व्हॉट्सअप स्टेटसवरून दादांना भावनिक साद 


४ रोहितनंही काकाला फेसबुकवरुन खुलं इमोशनल अपील केलं


५ रविवारी अजित पवारांचे  २० मिनिटांत २१ ट्विटस 


६ राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित पवारांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न 


७ मी राष्ट्रवादीतच आहे... शरद पवारच साहेब असल्याचं ट्विट 


८ अजित पवारांनी सोमवारी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला 


९ सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अजित पवारांची मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी 


१० अखेर बुधवारी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला