मुंबई : उद्धव ठाकरे हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी काल विधानसभेचं एक दिवसीय विशेष अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात २८८ पैकी २८५ नवनिर्वाचित सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली. भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि स्वाभीमानीचे देवेंद्र भुयार यांनी बुधवारी आमदारकीची शपथ घेतली नाही. तर कालीदास कोळंबकर हे स्वत: हंगामी अध्यक्ष असल्यामुळे त्यांना शपथ घेता आली नाही. विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर कालीदास कोळंबकर आमदारकीची शपथ घेतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदारांच्या शपथविधीसाठी अपक्ष महेश बालदी आणि एमआयएमचे मोहम्मद इस्माईल उशीरा पोहोचले. त्यामुळे त्यांना कालीदास कोळंबकर यांच्या चेंबरमध्ये शपथ देण्यात आली. मोहम्मद इस्माईल हे ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे त्यांना उशीर झाला, तर महेश बालदी अलिबागहून मुंबईला येत असताना त्यांची बोट खराब झाली, त्यामुळे ते उशीरा पोहोचले.


हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या बड्या नेत्यांना शपथ दिली.


कालीदास कोळंबकर यांनी बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना सदस्यांना शपथ देण्यासाठी सदनाचे पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त केलं. पीठासीन अधिकारी पाचपुते आणि गावित यांनी सगळ्यात आधी शपथ घेतल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सदस्यांच्या वरिष्ठतेनुसार शपथग्रहण सोहळा पार पडला.


अजित पवार, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, हरीभाऊ बागडे हे सगळ्यात आधी शपथ घेणाऱ्या सदस्यांपैकी होते. अजित पवारांनी शपथ घेतली तेव्हा राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरजोरात बाक वाजवून त्यांचं स्वागत केलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरवली जाऊ शकते.