मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ६ दिवस झाल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तासंघर्ष सुरूच आहे. भाजपकडून मातोश्रीवर अद्याप कुठलाही संपर्क झाला नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसंच जे जे शक्य होईल ते सर्व करणार असल्याचं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे. उद्या शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेचा विधानसभेचा गटनेता ठरवला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५०-५० फॉर्म्युला आणि अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात हा फॉर्म्युला ठरला, असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र असा कोणताच फॉर्म्युला ठरला नसल्याचं सांगितलं. यानंतर संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीची घोषणा झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ दाखवला.


दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. कोणीही शंका उपस्थित करण्याचं कारण नाही, महायुतीचंच सरकार स्थापन होणार आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. चर्चा तर होत राहतील. या चर्चा होऊ द्या, त्याशिवाय मजा नाही, असं वक्तव्य विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि उद्धव ठाकरेंचेही आभार मानले आहेत. तसंच मोदींमुळेच केंद्रात आणि राज्यात सरकार आल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.


विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकत भाजप हा सगळ्या मोठा पक्ष ठरला, तर शिवसेनेला ५६ जागा, राष्ट्रवादीला ५४ जागा आणि काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला. तर इतरांना २९ जागा मिळाल्या.