मनश्री पाठक, झी मीडिया, मुंबई  : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Vidhansabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. आता जागावाटपासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केलीय. महायुतीत (Mahayuti) जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. लोकसभेत जागावाटपावरून (Seat Sharing) उशीर झाल्यानं महायुतीला चांगलाचं फटका बसला होता. त्यामुळे विधानसभेला खबरदारी म्हणून महायुतीचे उमेदवार ठरणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात
महायुतीत 80 टक्के जागावाटप निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढवणार असून 2019 प्रमाणेच जवळपास सुमारे दीडशे जागा लढविण्याचा भाजपचा (BJP) आग्रह आहे. घटकपक्ष मिळून 160 जागांवर लढण्याची भाजपची तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे. 80 टक्के जागांवर एकमत झाल्यानं उर्वरित जागांवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीतील नेते प्रयत्नशील आहेत. 


महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची?
महायुतीतल्या जागावाटपात मुंबईवरुन तिनही पक्षात रस्सीखेच सुरु आहे. भाजप-शिवसेनेचा मुंबईसाठी 50-50 चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत जास्तीत जास्त 2 ते 2 जागा सोडण्याची महायुतीच्या गोटात चर्चा  आहे. मुंबई शिवसेनेचीच असल्याची दावा आज शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यातून करण्यात आला. प्रत्येक पक्षाकडे असलेल्या नगरसेवकांची संख्या आणि त्यांचे प्रभावक्षेत्र या आधारे मुंबईतील जागावाटप व्हावे अशी शिवसेनेची मागणी आहे 


शिवसेनेकडे 60 पेक्षा अधिक नगरसेवक असल्याचा दावा किरण पावस्कर यांनी केलाय. त्यामुळे मुंबईत भाजप-शिवसेनेत 50-50 चे सूत्र लागु करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय. तर  मुंबईत जागा वाढवण्याचे उद्दीष्ट भाजपसमोर आहे.


ठाणे मतदार संघात दोन नेत्यांचा दावा
दुसरीकडे, मुंबई लगतच्या ठाणे शहर मतदार संघावर शिवसेना शिंदे पक्षाच्या दोन नेत्यांनी दावा केलाय. माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी आमदारकी लढवण्याची तयारी सुरु केलीये. सध्या ठाणे शहर मतदार संघात गेले 2 टर्म भाजपचे संजय केळकर आमदार आहेत. मात्र संजय भोईर यांनी देखील आमदारकी लढवण्याची तयारी सुरु केलीये. जागा वाटपात ही जागा मिळाली नाही तरीही संजय भोईर इतर पर्याय वापरून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सूत्रांनी माहिती दिलीये..


विधानसभेसाठी शिवसेनेची स्ट्रॅटेजी
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं रणनीती आखली आहे. लोकसभेत न मिळालेली मतं विधानसभेत मिळावीत याकरता शिवसेनेनं स्ट्रॅटेजी आखली आहे. एसटी आणि अल्पसंख्याक समाजाची मतं शिवसेनेकडे वळवण्याची रणनीती ठरली आहे. एसटी समाजासाठी घेतलेले निर्णय समाजापर्यंत पोहोचवा, प्रत्येक बौद्ध विहारात जाऊन लोकांना भेटा, प्रत्येक समाजाच्या धर्मगुरुंपर्यंत पोहोचा, तसंच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात लाडकी बहीणचे किमान 15 मेळावे झालेच पाहिजेत, अशा सूचना श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.