Maharashtra Politics : राज्यात निवडणुका जाहीर झाल्या असून आता जागावाटपाला वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजपलाच झुकते माप दिले जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात जागावाटपासंदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी  'भाजपनं मोठा त्याग केला' याची आठवण करुन दिली होती. आता यावर शिंदे गटाच्या आमदाराने भाजपला सुनावलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाच्या आमदाराने सुनावलं
भाजपाने त्यागाची आठवण करुन दिल्यानंतर आता शिंदे गटाकडूनही उत्तर देण्यात आलं आहे. आम्ही धाडस केलं नसतं तर तुमच्या त्यागाला काय महत्त्व होतं? आम्ही आमच्या आमदारकी पणाला लावली असं शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी सुनावलं आहे. आम्ही आमच्या आमदारकी गुवाहटी जाऊन पणाला लावल्या, फडणवीसांवर झालेला अन्याय दूर केला याची आठवण आमदार पाटील यांनी करून दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती मध्ये जागा वाटपात एकनाथ शिंदेंनी त्यागाची भूमिका घ्यावी असा सल्ला दिल्यानतंर शिवसेना आमदार आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमादारांसह धाडसी पाऊल उचलून उठाव केला नसता तर आज भाजपा आमदार विरोधी बाकांवरच बसले असते असं उत्तरही शिवसेनेच्या आमदारांनी दिलं आहे. 


काय म्हणाले होते अमित शाह
'मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं पद आहे. ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी तेव्हा त्याग केला' याची आठवण अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करुन दिली होती.  एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने भाजपसोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली. युती सरकारमध्ये फडणवीसच मुख्यमंत्री होईल असं त्यावेळी चित्र होतं. पण पत्रकार परिषदे घेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती