मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. निवडणुकीच्या आखाड्यात दिग्गज नेते उतरले आहेत. भाजपने तर राष्ट्रीय नेत्यांची फौजच उतरवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही आज सात प्रचारसभा होणार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या सभा होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे हे धाराशीव, परांडा, बार्शी, करमाळा, सांगोला, मोहोळ, सोलापूर याठिकाणी महाआघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतील. तर आदित्य ठाकरेही वाशीम जिल्ह्यातील रिसोडमध्ये सभा घेतील त्यानंतर भांडूप आणि दिंडोशीमध्ये त्यांची सभा होईल..


भाजपकडून राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी, जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती असे दिग्गज प्रचारासाठी राज्य पिंजून कढणार आहेत. राजनाथ सिंह यांच्या आज मुंबईत तीन सभा आहेत तर योगी आदित्यनाथ यांच्या पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपुरात एकून चार सभा होणार आहेत. स्मृती इराणी आज पुणे, सांगली आणि इचलकरंजी इथं तीन घेतील तर केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योतींची सटाण्यात एक सभा होईल. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्याही आज दोन सभा होणार आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसही पूर्ण ताकतीनिशी प्रचारात उतरलीये. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज तीन प्रचारसभा आहेत. मराठवाड्यातील कन्नड आणि वैजापुरात तसंच कोपरगावमध्ये एक सभा होणार आहे. तर अमोल कोल्हे यांच्या आज तीन सभा होणार असून पाटण तालुक्यातील तळमावले, डिस्कळ तालुक्यातील खाटाव आणि कोरेगाव उत्तरमधील सभेतून ते राष्ट्रवादीसाठी मतांचा जोगवा मागतील. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज रोहित पवार यांच्यासाठी नान्नज येथे एक प्रचार सभा घेतील. तर धनंजय मुंडे बाजार सावंगी इथे सभा घेतील. 


वंचित बहुजन आघाडीही हळूहळू प्रचारात जोर धरु लागलीये. वंचित बहुजन आघाडीची परभणी, मुंबई आणि औरंगाबादत आज सभा होत आहे. मुंबईतील सोमय्या मैदानावरयासाठी जैय्यत तयारी करण्यात आली. तर विधानसभा निवडणुकीसाठी बसपाप्रमुख मायावती यांची पहिलीच सभा आज नागपुरातही होणार आहे.