PM Modi in Mumbai : पंतप्रधानांच्या सभेसाठी मुंबईतील वाहतूक मार्गांमध्ये बदल; 6 दिवस `इथं` नो पार्किंग
PM Modi in Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि मुंबईच्या दौऱ्यावर असून, शिवाजी पार्क इथं त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.
PM Modi in Mumbai : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच आता मोठ्य़ा नेत्यांनी प्रचारसभांमध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा यात मागे नाहीत. गुरुवारी, मोदींच्या तीन जाहीर सभा पार पडणार आहेत. यामध्ये मुंबईतील शिवाजी पार्क इथं पार पडणारी सभा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
गुरुवारी दुपारी 12 वाजता संभाजीनगरमधील चिखलठाण्यातील एमआयडीसीत पंतप्रधानांची जाहीर सभा पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता खारघर इथं त्यांची सभा होणार आहे. यानंतर संध्याकाळी 6 वाजता मोदींची शिवाजी पार्कात जाहीर सभा पार पडेल. पंतप्रधानांच्या मुंबईतील सभेच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कात जय्यत तयारी करण्यात आली असून, कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर शहरातील काही वाहतूक मार्गांमध्ये बदलही करण्यात आले आहेत.
मोदींच्या सभेसाठी राजकीय मान्यवरांसह सामान्यांची होणारी गर्दी पाहता शहरातील पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गांवर गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी यादरम्यान पर्यायी वाहतूक मार्गांचा वापर करावा असं आवाहनही पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे.
पर्यायी वाटांनीच करा प्रवास...
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग येस बँक जंक्शन ते सिद्धीविनायक मंदिर जंक्शनसाठी पर्यायी मार्गानं दांडेकर चौक इथून डावीकडे पांडुरंग नाईक मार्गे राजा बढे चौक इथं उजवं वळण घ्यावं. इथून एल जे रोडवरून गोखले रोड किंवा एनसी केळकर रोड या रस्त्यांचा वापर करावा.
हेसुद्धा वाचा : फडणवीस यांनी फाईल घरी का नेली?; सिंचन घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
सिद्धीविनायक मंदिर जंक्शनपासून येस बँक जंक्शनपर्यंत येण्यासाठी एस के बोले रोड, आगार बाझार, पोर्तुगीज चर्च या रस्त्यांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यानच्या काळात दक्षिण मध्य मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या रस्त्यांवर नेहमीपेक्षा अधिक वाहतूक कोंडी अपेक्षित असल्याचंही सांगण्यात येत आहे.
कुठे असेल No Parking?
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, बाबासाहेबर वरळीकर चौक, माहीम, केळुस्कर रोड दक्षिण आणि उत्तर, एम बी राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजी पार्क गेट क्रमांक 4 ते शितलादेवी, गडकरी जंक्शन ते शोभा हॉटेल दादर, हनुमान मंदिर जंक्शन एनसी केळकर मार्ग ते गडकरी जंक्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग इथं वाहनं उभी करण्यास सक्त मनाई असेल.
निवडणूक काळात कोणत्या रस्त्यांवर पार्किंगला बंदी?
खार पश्चिमेला असणाऱ्या आर व्ही टेक्निकल हायस्कूरमध्ये निवडणुकीसाठी स्ट्राँग रुम तयार करण्यात आल्यामुळं इथं वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 18 नोव्हेंबर रात्री 11 वाजल्यापासून 23 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत No Parking चा नियम लागू असेल.