मुंबई : दुधात तसंच अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना यापुढे जन्मठेपेची शिक्षा केली जाणार आहे. भेसळ हा दखलपात्र गुन्हा देखील मानला जाणार आहे. दूध भेसळीबाबत विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी ही घोषणा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी अशी भेसळ करणाऱ्यांना लगेच जामीन मिळत होता. जास्तीत जास्त फक्त सहा महिन्याच्या शिक्षेची तरतूद होती. यामुळे भेसळ करणा-यांना लगाम नव्हता, शिवाय कायद्याचा धाकही नव्हता. त्यामुळंच आता जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार असून, त्याबाबतचा कायदा याच अधिवेशनात आणणार असल्याचं बापट यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी दूध भेसळीच्या मुद्यावर लक्षवेधी सूचना मांडली होती.



भाई जगताप यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बापट यांनी भेसळीचा गुन्हा अजामीनपात्र करण्यात येईल, असं सांगितले. याआधी हा गुन्हा अदखलपात्र होता. तसंच, गुन्ह्याची शिक्षा फक्त सहा महिन्यांपर्यंत होती. त्यामुळं कायद्याचा धाक नव्हता. मात्र, यापुढं हा गुन्हा दखलपात्र नसेल. या संदर्भातील कायदा आणखी कठोर केला जाईल, असंही बापट यांनी स्पष्ट केले.