विधानसभा अध्यक्षपद निवडणूक; राज्य सरकार सावध, धोका टाळण्यासाठी आवाजी मतदान?
Maharashtra Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्ष ( Assembly Speaker Election) पद निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राज्य सरकार सावध पवित्रा घेत आहे.
दीपक भातुसे / मुंबई : Maharashtra Assembly Speaker Election : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून कुरबुरी सुरुच आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे नाराजीत भर पडली आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद अद्याप रिक्त आहे. विधानसभा अध्यक्ष पद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. मात्र, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप विधानसभा अध्यक्ष ( Assembly Speaker Election) पदाची निवडणूक झालेली नाही. विरोधकांनी या निवडणुकीत धोका आहे म्हणून घेतली जात नाही, असा आरोप केला आहे. मात्र, कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राज्य सरकार सावध पवित्रा घेत आहे. आता या निवडणुकीत कोणताही धोका नको म्हणून राज्य सरकार आवाजी मतदानाची चाचपणी करत असून तशी चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने घेण्याऐवजी आवाजी मतदानाने घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडीचा सावध पवित्रा, दिसून येत आहे. विरोधकांकडून कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून आवाजी पद्धतीने मतदान घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
राज्य विधिमंडळ नियमानुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवड गुप्त पद्धतीने होते, मात्र ही निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यासाठी विधीमंडळाच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तसा प्रस्ताव विधिमंडळ नियम समिती तयार करत आहे, अशी माहिती पुढे आली आहे. हा प्रस्ताव पुढील अधिवेशनात मंजूर केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
या समितीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप पक्षाचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी समितीची बैठक पार पडली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोणताही धोका होऊ नये म्हणून आवाजी पद्धतीने मतदान घेण्यासाठी पसंती मिळत आहे. तशा हालचाली सुरु झाल्या आहेत.