Uddhav Thackeray ShivSena and MNS: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होतायत. 23 नोव्हेंबरला याचा निकाल लागणार आहे. सर्वच पक्षांनी यासाठी जोरदार तयारी केली असून प्रचार सभांचा धडाका सुरु झालाय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.यात आता 18 नोव्हेंबरला दुपारी प्रचार बंद होत होतोय. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबरची प्रचारसभेसाठी शेवटची रात्र आहे. त्यामुळे ही सभा शिवाजी पार्क मैदानावर व्हावी, असा दोन्हीही ठाकरेंचा आग्रह आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी इतर राजकीय पक्षास सहभाग घेण्यास परवानगी दिल्यास संघर्ष उद्भवू शकतो, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी, असे मत ठाकरेंच्या शिवसेनेने मांडले आहे. त्यांनी यासंदर्भात महापालिका आणि निवडणूक आयोगाकडे पत्रदेखील दिले आहे.


बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन 


17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असल्याने हजारो शिवसैनिक स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत असतात.  त्यामुळे मनसेला  परवानगी मिळाल्यास कुठलीही संघर्षाची ठिणगी पडू नये यासाठी  शिवाजी पार्कवर सभा  घेण्याची परवानगी मिळावी, अशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची  मागणी आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात  राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे उमेदवार आहेत. अशावेळी 17 नोव्हेंबरला स्वतः राज ठाकरे हे अमित ठाकरे यांच्या प्रचारार्थ शिवाजी पार्क मैदानावर सभा घेणार आहेत. यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह आहे. 


माहिम मतदार संघातील अमित ठाकरेंची जागा निवडणून आणण्यात शिवाजी पार्कवरील राज ठाकरेंच्या सभेचा मोठा हात असू शकतो हे मनसेच्या कार्यकर्त्यांना ठाऊक आहे. शिवाजी पार्क मैदान सभेसाठी मिळावे यासाठी  दोन्ही पक्षाकडून मुंबई महापालिका प्रशासनाला विनंती करण्यात  आली आहे 


काय सांगतो नियम?


दसरा मेळाव्याच्यावेळी देखील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात शिवाजी पार्कच्या मैदानावरुन वाद पाहायला मिळतो. अशावेळी पालिकेचा नियम सांगण्यात येतो. प्रशासनाच्या नियमानुसार मैदानाच्या परवानगीसाठी जो पक्ष सर्वात आधी पत्र पाठवेल, त्यांना परवानगी मिळते. आता यामध्ये मनसेने परवानगी पत्र आधी दिले असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. 


मैदान कोणाला मिळणार याबद्दल गूढ कायम


प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून शिवाजी पार्क मैदानावर एक तरी सभा ही घेतली जाते, त्यामुळे शेवटची सभा शिवाजी पार्क मैदानावर घेण्यावर ठाकरेंची शिवसेना प्रयत्नशील आहे. त्यामुळे  प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मैदान राज ठाकरेंना मिळतं की उद्धव ठाकरेंना मिळणार  हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महापालिकेकडून 10 नोव्हेंबर, 12 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबर या तीन  दिवसासाठी इतर राजकीय पक्षांना सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र महापालिकेकडून 17 नोव्हेंबरबद्दलचे गुढ कायम ठेवण्यात आले आहे.