`श्री सदस्यांचा मृत्यू क्लेषदायक` दुर्घटनेवर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया
केद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो श्री सदस्य उपस्थित होते. पण उष्माघाताने यातल्या अनेकांची प्रकृती बिघडली.
Maharashtra Bhushan Award : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे (HeatStroke) आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका रूग्णालयात (Navi Mumbai Municipal Hospital) आज कल्याण आणि विरारमधल्या दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याशिवाय कामोठ्यातल्या एमजीएम रूग्णालयात (MGM Hospital) सध्या 15 रूग्ण उपचार घेत आहेत. 15 पैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेवर ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
'श्री सदस्यांचा मृत्यू क्लेषदायक'
महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यासाठी खारघर इथं आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुबांचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्देवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे.
आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दु:ख शब्दात व्यक्त करण्याापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांना सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, असं आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कार्यक्रमाला 20 लाखांची उपस्थिती
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला जवळपास 20 लाख लोक उपस्थित होते. अजूनही तीन जणांचा शोध लागलेला नाही. उन्हात कार्यक्रम झाल्यानंतर अनेक सदस्यांना चक्कर येणे, उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर यांनी एमजीएम रूग्णालयात जाऊन दाखल असलेल्या श्री सदस्यांची विचारपूस केली. ज्यांचा मृत्यू झालाय, त्यांच्या वारसांना सरकारनं ५ लाखांची मदत जाहीर केलीय. रुग्णालयात दाखल असलेल्यांवर सरकारी खर्चानं उपचार केले जाणार आहेत.