अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : राज्यातील बदलत्या स्थितमुळे भाजपामध्ये अस्वस्थतता पसरली आहे. विरोधकांची झालेली एकजूट, शिवसेनेची सुरू असलेली टीका, बदलती सामाजिक समीकरणे यामुळे भाजपाने निवडणुकपूर्व तयारीला सुरुवात केली आहे.  


विरोधकांची हातमिळवणी, भाजपला टेन्शन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस - राष्ट्रवादीने हातमिळवणी केली असल्याने आता विरोधकांची मते विभागली जाणार नाहीत हे आता नक्की झाले आहे. शिवसेनेने एकला चलो रे चा नारा दिला आहे. त्यातच भाजप पराभूत होऊ शकतो हे गेल्या काही महिन्यातील निवडणुकांमध्ये दिसून आल्याने विरोधकांमध्ये आत्मविश्वास आला आहे. कोरेगांव - भीमा प्रकरण, शेतकरी प्रश्न, मंत्रालयातील धर्मा पाटील प्रकरण यामुळे भाजप विरोधी वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच या सर्व बदलत्या समीकरणांवर मंगळवारच्या कोर कमिटी बैठकीत चर्चा करत निवडणूक पूर्व तयारीच्या दृष्टीने संघटनात्मक अशी पावले टाकण्यात आली.


काय केली तयारी?


भाजप कोर कमिटी बैठक, पक्षाची निडवणूक पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यातील निवडणुकांमध्ये बूथ प्रमुखांमुळे पक्षाला विजय मिळाले होते. बैठकीत बूथ प्रमुखांबद्दल आढावा घेतला गेला.  जिल्हानिहाय पक्ष कार्यालये स्थापन झाली आहेत का याचा आढावा घेतला गेला. तसेच, पक्ष सदस्य नोंदणीबाबत आढावा घेतला गेला.  


काय घेतले निर्णय?


आत्तापर्यंतचे झालेले सरकारचे निर्णय खाली पोहचावेत यासाठी पक्षयंत्रणेमार्फत पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करण्याचे निश्चित झाले.  महामंडळमधील सदस्य नेमणुकीबद्दल लवकर निर्णय घ्यायचे निश्चित करण्यात आले.  पक्षातील नाराजांबद्दलच्या स्थितीबाबत चर्चा झाली. सरकारमार्फत सुरू असलेले प्रकल्प लवकर पूर्ण करणे, कामे वेगाने पुढे नेणे याबाबत चर्चा झाली.  


शिवसेनेच्या नाराजीबद्दलही चर्चा


या बैठकीत शिवसेनेच्या नाराजीबद्दलही चर्चा झाली. मात्र यांवर भाजपच्या सूत्रांनी मत व्यक्त करणे टाळले. थोडक्यात एक वर्षांपूर्वी महापालिका - जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याची जाणीव भाजपाला झाली आहे. पुन्हा निवडणूक तीही एकहाती जिंकू या भ्रमातून भाजपाचे पाय जमिनीला लागल्याचं कोर कमिटीच्या बैठकीतून स्पष्ट झालं आहे.