Maharashtra Budget 2019: आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.
मुंबई : आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी निवडणूक पाहता आजच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात सरकारने घेतलेल्या निर्णयांचा देखील अर्थसंकल्पात केला जाणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या कोरडवाहू आणि जिरायत शेतकऱ्यांना अनुदान जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच रोजगाराबाबतही काही घोषणा होऊ शकतात. स्मारकांसाठी निधीची घोषणा होऊ शकते. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दिशेने काही घोषणा होण्याची शक्यता आहे.
दुपारी 1.30 वा. मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वा विधानसभेत सन 2019- 20 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचा 2019-20 वर्षाचा हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने जून - जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आज सादर होणार अंतरिम अर्थसंकल्पमध्ये पुढील 3 महिन्याच्या खर्चाचे नियोजन सादर केले जाणार आहे. असं असलं तरी दुष्काळ संदर्भातल्या उपाययोजना, शेतकरी कर्जमाफी, आपत्कालीन खर्च यासाठी तरतूद अर्थसंकल्प मांडतांना करावी लागणार आहे. तसंच 5 लाख कोटी रुपयांच्या कर्जाकडे वाटचाल करणा-या राज्यासाठी काही लक्षवेधी घोषणा राज्य सरकार करणार का याकडे देखील लक्ष असेल.