मुंबई : Maharashtra Budget 2021 : महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करताना शेतकऱ्यांसाठी (Farmer) मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज देण्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर केले आहे. तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. कृषी बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1500 कोटी रुपयांचा महावितरणला निधी दिला जाणार. तसेच 'विकेल ते पिकेल' योजनेला 2100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. कोरोना काळात उद्योग सेवा क्षेत्रात घट झाली आहे. मात्र, कृषी क्षेत्रात 11 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी म्हणून सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असे ते म्हणाले.


राज्यात करोना आणि लॉकडाऊनच्या काळात कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सावरले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार. 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी कर्ज थेट वर्ग केले गेले. शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले. यंदा 42 हजार कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे, अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले. तसेच कृषी क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी 200 कोटी दरमहा देण्यात येतील, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.


कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये कायमस्वरूपी राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची तुकडी ठेवण्याची केंद्राकडे मागणी आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी 11315 कोटी रुपये देणार आहोत. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम 44 टक्के पूर्ण झाले असून, 500 किमीचा रस्ता 1 मेपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले.