दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या योजनेबद्दल माहिती दिली आहे. या योजनेसाठी १२५ कोटी रुपये लागणार आहेत. रस्त्यावर होणाऱ्या अपघातात तातडीने उपचार व्हावेत यासाठी ही योजना असल्याचं राजेश टोपे म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेत ७४ पॅकेज असतील, अपघातानंतर मोफत उपचार मिळावेत, यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. यासाठी राज्यातल्या अनेक रुग्णालयांचा समावेश केला जाईल. तसंच घरातील अपघात आणि रेल्वे अपघात यांचा या योजनेत समावेश नसेल, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. 


दरम्यान कोरोनाच्या संकटात ऑक्सिजन सिलिंडरच्या तुटवड्यावरही राजेश टोपे यांनी भाष्य केलं. कोविडसाठी ५०० टन आणि नॉन कोविडसाठी ३०० टन अशी ८०० टनांची गरज आहे. आपल्याकडे १ हजार टन ऑक्सिजन उत्पादित होते, म्हणजेच २०० टन उत्पादन जास्त आहे, पण ऑक्सिजन वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी नायट्रोजन वाहतूक करणारे ट्रक वापरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. 


ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या ट्रकना अॅम्ब्युलन्सचा दर्जा देण्यात आला आहे. लिक्विड ऑक्सिजन टाक्या प्रत्येक जिल्ह्यात उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात डुरा आणि जम्बो सिलिंडर वाढवायलाही सांगितलं आहे. त्या माध्यमातून ऑक्सिजन बेडची संख्या वाढवली जाणार आहे. ऑक्सिजनसाठी कंट्रोल रुमही स्थापन केलं जाणार आहे आणि ऑक्सिजन वापराचं ऑडिटही केलं जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. 


दुसरीकडे राज्यात दीड लाख टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यातल्या १ लाख अॅन्टीजेन आणि ५० हजार आरटीपीसीआर टेस्ट असतील, असं राजेश टोपे म्हणाले.