मुंबई: राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी पार पडला. यावेळी भाजपचे १०, शिवसेनेचे २ तर रिपाईचा एक अशा १३ नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राजभवनावर पार पडलेल्या विशेष सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसशी बंडखोरी करून बाहेर पडलेले राधाकृष्ण-विखे पाटील यांना अपेक्षेप्रमाणे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतल्याने त्यांचा भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश झाला आहे. तर विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या 'अरे' ला 'कारे' ने प्रत्युत्तर देणारे मुंबई भाजपचे अध्यक्ष यांच्या गळ्यातही कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली. तर शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांच्याकडे राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्षपद सोपवण्यात येणार आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येईल. 


तर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, राजे अंबरिश अत्राम, दिलीप कांबळे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारले आहेत. दरम्यान, आता कोणत्या मंत्र्यांच्या वाट्याला कोणते खाते येणार, ही नवी उत्सुकता सर्वांना लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच नव्या मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. 



कॅबिनेट मंत्री 


राधाकृष्ण विखे पाटील 
आशिष शेलार 
संजय कुटे 
सुरेश खाडे 
डॉ. अनिल बोंडे 
डॉ. अशोक उईके 
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) 
तानाजी सावंत (शिवसेना) 


राज्यमंत्री


योगेश सागर 
अतुल सावे 
संजय उर्फ बाळा भेगडे 
परिणय फुके 
अविनाश महातेकर