मुंबई: राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार बारगळल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरु होती. त्यामुळे कोणकोणत्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारातील वाट्यावरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गर्जना केल्या जात होत्या. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे नेते पुन्हा पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्या म्हणजे १४ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचीही चर्चा जोरात होती. मात्र, प्रशासनातील सूत्रांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या अनेक आमदारांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असल्यामुळे आताचा मुहूर्त टळला तर पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार?, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.


राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी तर काहींचं मंत्रीपद जाणार?


काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलासंदर्भात शहा यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. यानंतर शिवसेना आणि मित्र पक्षांनाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणं मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे भाजपच्या नेत्यांनी म्हटले होते. तेव्हापासून विधिमंडळ अधिवेशनापूर्वी खातेविस्तार आणि बदल होण्याच्या चर्चेने आणखीनच जोर धरला होता. मात्र, आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.


शिवसेनेत मंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच, सुभाष देसाईंना विरोध