ठरलं.. शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १३ मंत्रिपदं तर काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद
महाविकास आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे.
मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकासआघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरल्याची ठोस माहिती समोर आली आहे. 'एएनआय' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रीपदासह १५ मंत्रिपदे आली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपदासह १३ खाती देण्यात आली आहेत. तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद न देता विधानसभेचे अध्यक्षपद सोडण्यात आले आहे. त्यांनाही राष्ट्रवादीप्रमाणे १३ मंत्रिपदे देण्यात आली आहेत.
काल भाजपने सत्तास्थापनेच्या लढाईतून माघार घेतल्यानंतर मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची बैठक पार पडली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंती पाटील यांनी महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमताने मंजूर केला. यानंतर सभागृहात एकच जल्लोष पाहायला मिळाला. आता गुरुवारी शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडेल.
त्यामुळे साहजिकच महाविकासआघाडीमध्ये सत्तावाटपाची चर्चा सुरु झाली होती. यासाठी कालपासून तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते सातत्याने चर्चा करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष विधानसभेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी आग्रही होते. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याबद्दल उत्सुकता होती. अखेर काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद मिळाले आहे. मात्र, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष असे चित्र पाहायला मिळत आहे. याशिवाय, कोणत्या नेत्यांकडे कोणती खाती दिली जाणार, याचीही बरीच उत्सुकता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रावादीच्या नेत्यांनी अजित पवार यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री असलेल्या जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खात्याचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता आहे.