Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल शिर्डीच्या साईबाबांचं (Shirdi Saibaba) दर्शन घेतलं. दर्शनानंतर मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र त्यांचा ताफा सिन्नरच्या मिरगावच्या (Sinnar Mirgaon) शिवारात अचानक वळल्याने एकच धावपळ सुरू झाली. तिथे श्री क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिरात त्यांनी महादेवाची सपत्नीक पूजा केली. नाशिक शहरातील एक बड्या सुप्रसिद्ध राजकीय ज्योतिषी बाबाचे हे मंदिर आहे. त्याच्याकडून याआधीही मुख्यमंत्र्यांनी भविष्य जाणून घेतल्याची चर्चा असून आज त्याविषयी तोडगा काढण्यासाठी पूजा केल्याची चर्चा परिसरात रंगलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांची मुख्यमंत्र्यांवर टीका
मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या सिन्नरमध्ये ज्योतिषाला हात दाखवल्याचा आरोप केला जातोय. यावरुनच आता विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका सुरु केली आहे. आत्मविश्वासाला धक्का लागलेली व्यक्ती ज्योतिषाकडे जाते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) केलीय.  तर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनीही (Ajit Pawar) मुख्यमंत्र्यांचे कान टोचलेत. एकविसाव्या शतकात जग चाललेलं असताना असा प्रकार अंधश्रद्धांना खतपाणी घालणारा आहे असं अजित दादांनी म्हटलंय. पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. यावर काय बोलावं, आमच्यासारखे तर हतबलच झालेत.. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिलीय.  मुख्यमंत्र्यांनी स्वत:च यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.


शिंदे गटाने आरोप फेटाळले
शिंदे गटाने मात्र हे आरोप फेटाळलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सिन्नरमध्ये गोशाळेला भेट दिली, ज्योतिष पाहिलं नाही, असं स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिलं आहे. कॅप्टन खरात यांचं ईशान्येश्वर मंदिर असून तिथे गोशाळा व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी देणगी दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी ईशान्येश्वर मंदिराला आणि गोशाळेचं काम सुरु आहे त्याला भेट द्यावी अशी इच्छा कॅप्टन खरात यांनी व्यक्त केली होती असं स्पष्टीकरण केसरकर यांनी दिलं आहे.