मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Cm Uddhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात होळी आधीच महाशिमगा सुरू झाला आहे. राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यात दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. हा राजकीय संघर्ष नजीकच्या भविष्यात आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत. (maharashtra chief minister uddhav thackeray and union minister narayan rane controversy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे. एकमेकांचे राजकीय हाडवैरी. त्यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची धूळवड सुरू झाली आहे. नारायण राणे यांच्या जुहूमधील आलिशान अधीश बंगल्यावर मुंबई महापालिकेनं दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. येत्या सोमवारी महापालिकेच्या के पश्चिम विभागाची टीम राणेंच्या बंगल्याची पुन्हा पाहणी करणार आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या कथित तक्रारीवरून पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे.



महापालिकेनं बंगल्यावर कारवाई सुरू करताच राणेंनी थेट मातोश्रीवर हल्ला चढवला. मातोश्रीतल्या चौघांना ईडीची नोटीस येणार असल्याचा स्फोटक दावा राणेंनी केला.


एवढंच नव्हे तर सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियनचा खून झाला. दिशावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. तिच्या पार्टीत कोणता मंत्री उपस्थित होता, असा सवाल राणेंनी केला.


राणेंच्या आरोपांना शिवसेनेनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं. सिंधुदुर्गातल्या राजकीय हत्यांची चौकशी करा, अशी मागणी विनायक राऊतांनी केली. तर रिश्ते में हम आप के बाप लगते है, अशा शब्दांत संजय राऊतांनी राणेंचा मोठा घोटाळा बाहेर काढण्याचा सूचक इशारा दिला.


मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेंना अटक झाली. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंनाही अटक झाली. आता बंगल्यावरील कारवाईच्या निमित्तानं पुन्हा ठाकरे विरुद्ध राणे संघर्षाची ठिणगी पेटली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला हा शिमगा आणखी रंगण्याची चिन्हं आहेत.