मुंबई : राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे ( Sitaram Kunte) यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती (Maharashtra Chief Secretary) करण्यात आली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवनियुक्त मुख्य सचिव कुंटे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर मावळते मुख्य सचिव संजय कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर  कुंटे यांनी  संजय कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. (राज्याचे नवे मुख्य सचिव सीताराम कुंटे, पदभार स्वीकारला (Maharashtra Chief Secretary Sitaram Kunte assumes charge)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमारे २२ वर्षांपूर्वी ज्या मुख्य सचिव कार्यालयात सीताराम कुंटे यांनी सहसचिवपदी काम केले त्या ठिकाणी ते मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी विविध विभागांच्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. भारतीय प्रशासन सेवेतील 1985  च्या तुकडीचे असलेले कुंटे मूळचे सांगली येथील असून एम.ए (अर्थशास्त्र) आणि एलएलबीपर्यंत शिक्षण झाले आहे. 1986  मध्ये जळगाव येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कुंटे यांची प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी धुळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे म्हणून त्यांनी काम पाहिले.


2012मध्ये ते मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले. त्यानंतर पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, अल्पबचत आणि लॉटरीचे आयुक्त (अतिरिक्त कार्यभार), प्रधान सचिव (व्यय) म्हणूनही त्यांनी काम पाहिले. उच्च व तंत्रशिक्षण, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली. 27 ऑगस्ट 2020 पासून ते गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते.


राज्यपालांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. गृहनिर्माण, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव म्हणून काम पाहत असताना त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यानंतर ते वन विभागाचे सचिव झाले. महसूल विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता.