मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यातील विळा-भोपळ्याचं नातं संपूर्ण राज्याला माहित आहे. अनेक विषयांवरुन ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यात वाद झाले आहेत. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती असोकि अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अभिभाषण असो ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात टोकाचा वाद रंगला आहे. राज्यपालांच्या भूमिकेमुळे अनेकवेळा ठाकरे सरकारची कोंडी झालेली पहायला मिळालं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच काय तर काही दिवसांपूर्वीच राज्यापाल कोश्यारी यांनी औरंगाबदमधल्या एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. 


आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. अनेक नेत्यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आज राजभवनावर जात राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


राजभवन इथं मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज्यपाल कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवत आशिर्वादही दिले.


महाराष्ट्राचे राज्यपाल हे भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. उत्तराखंड राज्य अस्तित्वात आल्यानंतर कोश्यारी हे भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर एका वर्षासाठी त्यांनी मुख्यमंत्रीपदही भूषवले. 2009 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेवर खासदार म्हणून होते.