मुंबई : Corona व्हायरसचा प्रादुर्भाव ज्या वेगाने वाढत आहे, हे पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या हिताच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांची घोषणा त्यांनी रविवारी केली. सध्याच्या घडीला आपण एका मोठ्या संकटातून जात असल्याचं सांगत येत्या काळातील दिवस किती गंभीर आहेत याची जाणीव त्यांनी करुन दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात जमावबंदी लागू झाल्याचं सांगत पुढील काळात जनतेला होणाऱ्या गैरसोयींविषयीही त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. शिवाय येत्या काळात गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून काही गोष्टी, सेवा या पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 


काय बंद असेल? 


परदेशातून येणारी वाहतूक बंद. 
मालवाहतूक वगळता मुंबईची लोकलसेवा बंद. 
जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळळता इतर दुकानं बंद. 
अत्यावश्यक सेवांसाठीचा वापर वगळता बेस्ट बसमध्ये सामान्य नागरिकांचा प्रवास बंद. 
शाळा, महाविद्यालयं बंद. 
मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंद. 
मोठ्या प्रमाणावर कार्यालयं बंद. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सेवा पुरवण्यात याव्यात. 
शासकीय कार्यालयं पूर्ण बंद करण्याऐवजी या कार्यालयांमध्य फक्त पाच टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती. 


काय सुरु असेल?  


जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु. 
धान्य, किराणा मालाची दुकानं सुरु. 
भाजीपाला वाहतूक सुरु. 
औषधांची दुकानं सुरु. 
बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था सुरु. 
वीजपुरवठा कार्यालयं सुरु. 


थोडक्यात अत्यावश्यक असणाऱ्या सर्व सेवा सुरु ठेवण्यात येणार असून, त्याव्यतिरिक्तच्या सर्व सेवा येत्या काळात बंद राहणार आहेत. 


नागरिकांच्या धार्मिक समजूती, विश्वास या सर्व गोष्टींचा अंदाज घेत मुख्यमंत्र्यांनी पूजा अर्चा करण्याची परनावगी असल्याचं सांगितलं आहे. पण, यामध्ये मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी न करण्याचा इशाराही त्यांनी जनतेला दिला आहे.




कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता या काळात, नाईलाजाने अनेक उद्योग बंद करण्यात आले आहेत. पण, यासोबतच या उद्योग जगतात काम करणारे असंख्य कामगार हेच अर्थव्यवस्थेचा पाठकणा असल्याचं सांगत प्रशासनासोबतच संबंधित उद्योगाची मालकी असणाऱ्या मंडळींवरही या कामगार वर्गाची जबाबदारी असल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली. शिवाय या संकटसमयी कामगारांच्या किमात वेतनात कपात न करण्याची विनंती त्यांनी केली. माणुसकी सोडू नका असा संदेश देत त्यांनी पुढचे काही दिवस हे परीक्षेचे आहेत. अशी आठवण करुन देत ही परिक्षा पुढे ढकलता येणार नाही. याची उत्तरं इथेच देऊन हे संकट साफ करायचं असल्याचा विश्वास व्यक्त केला.