राज्यातील वीज ग्राहकांसाठी खूशखबर
राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 1 एप्रिलपासून वीज दर कमी होणार आहेत.
दीपक भातुसे / मुंबई : सध्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. इंधन दर, डाळी आणि तेल महागले आहे. या महागाईत आता दिलासा देणारी एक बातमी आहे. राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 1 एप्रिलपासून वीज दर कमी होणार आहेत. (Maharashtra Electricity Regulatory Commission Reduced Rates By 5 to 11Percent)
घरगुती वीज दर 5 ते 11 टक्क्यांनी कमी होणार आहेत. महावितरण, अदानी, टाटा, बेस्ट ग्राहकांनाही फायदा होणार आहे. हे नवे दर पाच वर्षांसाठी लागू असणार आहेत. या नवीन वीज दराबाबत राज्य वीज नियामक आयोगाचे शिक्कामोर्तब केलेे आहे.
राज्य वीज नियामक आयोगाने ((Maharashtra Electricity Regulatory Commission) राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार न पडू देता स्वस्तात वीज देण्याचं नियोजन केले आहे. वीज नियामक आयोगाने महागाईच्या काळात वीज दर कमी करण्याचा निर्णय गेतला आहे. घरगुती विजेच्या वापरात 5 ते 11 टक्के कपात करण्यात येणार आहे. नवे दर 1 एप्रिल 2021 पासूनच लागू होणार असल्यामुळे ग्राहकांना पुढच्या बिलापासूनच दिलासा मिळणार आहे.
आयोगाने जी दर कपात जाहीर केली आहे त्यानुसार राज्यातील विविध संवर्गासाठी वीज दरात सरासरी 7 ते 8 टक्के कपात सुचविली आहे. त्यानुसार महावितरणचे घरगुती वीज दर 5 ते 7 टक्क्यांनी कमी होणार आहेत. महाराष्ट्रातील उद्योगासाठीचे वीज दर तब्बल 10 ते 12 टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर शेतीसाठीचे वीज दर 1 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
मुंबईत बेस्टचे घरगुती विजेचे दर 1 ते 2 टक्क्यांनी कमी होणार उद्योगासाठीचे वीज दर 7 ते 8 टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर 8 ते 9 टक्क्यांनी आणि मुंबईत अदानी आणि टाटा कंपन्यांचे वीज दरही कमी होणार आहेत. घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल 10 ते 11 टक्क्यांनी कमी होतील. या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर 18 ते 20 टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर 19 ते 20 टक्क्यांनी कमी होणार आहेत.